लक्ष्मी आणि सरस्वती या दोन्ही देवतांचा कृपाशिर्वाद पाठीशी असेल तरच आपण यश, पैसा, प्रसिद्धी कमवू शकतो. कोणाही एकाचा आशीर्वाद मिळवून भागत नाही. लक्ष्मी उपासक तर आपण असतोच, पण वसंत पंचमीनिमित्त सरस्वती उपासकही बनूया. कारण, नुसता पैसा हाताशी असून उपयोग नाही, तर तो योग्य ठिकाणी कसा गुंतवावा, कुठे खर्च करावा, कोणत्या मार्गाने कमवावा हे कळण्यासाठी ज्ञान असणे आवश्यक आहे, ते सरस्वती मातेच्या आशिर्वादाशिवाय मिळत नाही. दसऱ्याला आपण शस्त्र आणि शास्त्र पूजा करतोच, त्याबरोबरच वसंत पंचमीलाही सरस्वतीची उपासना करणे आवश्यक असते. त्याबरोबरच आणखी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, ते जाणून घेऊ.
हिंदू धर्मात दानाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. कोणताही शुभ प्रसंग असो, त्यात दुसऱ्यांनाही आनंद मिळावा या उदात्त हेतूने दान धर्म करा असे सांगितले जाते. यंदा २ फेब्रुवारी रोजी वसंत पंचमीच्या (Basant Panchami 2025) मुहूर्तावर ही संधी मिळणार आहे. हा दिवस सरस्वती पूजेचा म्हणून ओळखला जातो. या दिवशी ज्ञान आणि कलेची प्रमुख देवता देवी सरस्वतीची पूजा करण्याची परंपरा आहे. म्हणून हा दिवस श्री पंचमी म्हणूनही ओळखला जातो.
नवीन कामांची सुरुवात:
बसंत पंचमीच्या मुहूर्तावर नवीन काम सुरू करण्याचा नियम आहे. या तिथीला मुलांचे मुंडण करणे, अन्नप्राशन करणे, मुलांना शाळेत दाखल करणे या गोष्टी करणे शुभ मानले जाते. बसंत पंचमीच्या दिवशी पिवळ्या रंगाचे नवीन कपडे कपडे घातले जातात. या दिवशी काही विशेष वस्तूंचे दान करणे देखील खूप शुभ मानले जाते. त्या वस्तू कोणत्या ते पाहू.
धान्य :
बसंत पंचमीच्या शुभ मुहूर्तावर अन्नधान्य दान केल्यास घरात शुभ परिस्थिती निर्माण होते. धार्मिक मान्यतेनुसार बसंत पंचमीच्या दिवशी अन्नदान केल्यास घरातील अन्न भांडार कधीच रिकामे होत नाही. संपत्ती आणि धान्यांनी भरलेले राहते.
पिवळ्या वस्तूंचे दान:
बसंत पंचमीच्या दिवशी पिवळ्या रंगाच्या वस्तूंचे दान केल्यास विशेष लाभ होऊ शकतो. पिवळे कपडे, पिवळे धान्य, पिवळी मिठाई या पिवळ्या वस्तूंचे दान केल्याने घरात सुख-समृद्धी येते.
अभ्यासाशी संबंधित गोष्टी
बसंत पंचमीच्या दिवशी गरीब आणि गरजू मुलांना शिक्षणाशी संबंधित वस्तू दान केल्यास त्याचा फायदा होतो. एवढेच नाही, तर आपली आर्थिक स्थिती चांगली असेल तर एखाद्या विद्यार्थ्याचा वार्षिक शैक्षणिक खर्च अंगावर घेऊ शकता. एखाद्याला ज्ञानार्जनाची संधी देणे हे महापुण्याचे काम आहे.
वसंत पंचमी 2025 तारीख आणि शुभ वेळ :
यावर्षी २ फेब्रुवारी २०२५ रोजी बसंत पंचमी येत आहे. २ फेब्रुवारी रोजी सकाळी 9.14 वाजता पंचमी तिथी सुरू होत आहे. पंचमी तिथीची समाप्ती ३ फेब्रुवारी रोजी सकाळी होत आहे. बसंत पंचमीच्या मुहूर्तावर सरस्वती पूजनाचा शुभ मुहूर्त सकाळी ७.१२ वाजल्यापासून सुरू होतो आणि दुपारी १२.५२ पर्यंत पूजा करता येईल.