>> अस्मिता दीक्षित, ज्योतिष अभ्यासक
निसर्ग कुंडलीचा अभ्यास सखोल आहे , जितके खोलात जाऊ तितकी ग्रहांची गुपिते उलगडत जातात . त्यांचे अस्तित्व आपल्याशी सरळ सरळ जोडले जाते म्हणूनच त्यांच्या विविध अवस्था आपल्या जीवनावर सुद्धा अनेकविध परिणाम करताना दिसतात.
कुंडली पाहताना जातक अनेक वेळा विचारतात, माझ्या पत्रिकेत हे दोन ग्रह उच्च आहेत, हा ग्रह केंद्रात आहे आणि तमका ग्रह स्वराशीत आहे पण तरीही आयुष्य एका उंचीनंतर वरती गेलेच नाही. आर्थिक स्तर उंचावला नाही , मान नाही , फार काही मिळवता आले नाही आयुष्यात असे का? ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न करुया.
नवमांश कशी पहावी आणि त्यावरून सारासार विचार करून फलादेश कसा द्यावा हे समजले नाही तर फलित चुकू शकते . अभ्यास कमी पडतो, म्हणूनच वरवरचा अभ्यास फलित कथन करण्यासाठी उपयोगाचा नाही. कुठल्याही ग्रहाचे बळ हे आपल्याला नवमांश मधूनच समजते .ग्रहाची ताकद ओळखणे महत्वाचे असते ती ओळखता आली तर ग्रह किती उच्चीचे फळ देऊ शकेल ह्याचा अंदाज येतो. नवमांशला डावलून भाकीत करता येणारच नाही.
आपला आत्ताचा जन्म हा मागील अनेक जन्मातील चांगल्या वाईट कर्माचे प्रतिबिंब आहे आणि त्यानुसार फळ देण्यास ग्रह सुद्धा बांधील आहेत. जेव्हा एखादी घटना घडते मग ती चांगली असो अथवा वाईट, ते तुमच्याच कर्माचे फळ असते त्यामुळे दुसऱ्याला दोष देणे किंवा खुद्द ग्रहांना धारेवर धरणे बंद केले पाहिजे . तुम्ही जे जे गतजन्मात केले आहे त्याचे परिणाम देणारे ग्रह हे एक मध्यम आहे हे सर्वप्रथम समजून घ्या. ग्रह तुमचे शत्रू नाहीत.
ग्रहांच्या अनेक अवस्था जसे नीच, उच्च, अस्तंगत, वक्री, स्तंभी. उच्च अवस्थेला दीप्त अवस्था म्हंटलेले आहे. हा उच्च ग्रह ज्या भावांचा कारक आहे त्या भावांचे उच्च फळ देतो इतकी ताकद त्यात आहे. प्रत्येक ग्रह किती डिग्रीवर म्हणजेच अंशावर असताना त्याला उच्चत्व मिळेल आणि त्या प्रमाणे तो फळ सुद्धा देईल हे पंचांगात दिलेले आहेच. पूर्व जन्मात ह्या ग्रहाने दर्शवलेल्या भावात काहीतरी चांगले कर्म केल्यामुळे ह्या जन्मात तो ग्रह त्याच भावात उच्च झालेला आहे . त्यामुळे त्या भावांसाठी खूप कार्य न करताही त्यातून उत्तम फळ मिळणारच आहे.
शुक्र गुरूच्या मोक्षाच्या राशीत जेव्हा उच्च होतो तेव्हा तो भौतिक सुखाची रेलचेल न करता मनापासून प्रेम करायला शिकवतो पण त्याच्या बदल्यात जोडीदाराकडून अपेक्षा ठेवत नाही. निखळ अपेक्षा विरहित प्रेम करत राहतो . मीन राशी मोक्षपदाला नेणारी आहे तिथे भौतिक सुखांची अपेक्षा करणेच चुकीचे आहे. देवगुरु बृहस्पती प्रमाणे शुक्र सुद्धा गुरूच आहेत .म्हणूनच मोक्षाच्या राशीतील हा उच्चीची लेणी परिधान केलेला शुक्र व्यक्तीला भौतिक सुखाकडून परास्त करून परमार्थाची गोडी लावतो . तिथे फक्त जातकाला ईश्वरी पावलांचा आणि अध्यात्माचा साक्षात्कार होतो .
जगाचा चालक मालक पालक रवी म्हणजेच राजा हा सर्वगुणी असला पाहिजे , सर्वांचे भले आणि हित जपणारा, वेळप्रसंगी कडक शासनकर्ता आणि कधी क्षमाशील, उदा, गुरूंची आज्ञा पालन करणारा. असा हा रवी केतूच्या विरक्तीकडे नेणाऱ्या अश्विनी नक्षत्रात मेष राशीत १० अंशावर उच्च होताना दिसतो. तिथे अहंकाराचा लवलेश नसतो पण पुढील अंशावर चित्र बदलते, अहंकार असू शकतो.
मन प्रसन्न असेल तर अजून काहीच लागत नाही . चंद्रमा वृषभेत उच्च होतो. वृषभ राशी ही कुटुंब भावातील राशी, जिथे आपले मन आपल्या कुटुंबात असते. सगळ्यात परमोच्च आनंद आपण आपल्या घरात असतानाच मिळतो. आपल्या लोकांसमवेत जीवन सुखावह होते. उत्तम भोजन केले आणि त्याची प्रशंसा भोजन ग्रहण करणाऱ्या व्यक्तीने केली तरी मन सुखावते म्हणूनच चतुर्थ भावाला सुखस्थान म्हंटले असावे. मुलांचे यश किंवा कुठलीही आनंदाची बातमी ऐकून आनंदाश्रू येतात . म्हणूनच चंद्र इथे समृद्धी देताना दिसतो. निसर्ग कुंडलीमध्ये चतुर्थ भाव कर्क चंद्राचीच राशी दर्शवतो आणि चंद्र स्वतः कुटुंब भावात उच्च होतो.
घरात आल्यावर जगातील सर्व सुखे मिळतात आणि डोक्यावरील मणामणाच्या चिंताही दूर होतात, कारण घरात असते आई ही चंद्राचेच रूप आहे. आई पूर्ण घराचा विचार करते. कर्माचा समतोल ठेवून, सामंजस्य ठेवून वर्तन करा हे सांगणारा शनी तूळ राशीत २० अंशावर उच्च होतो. तुळ राशीत उच्च शनी असलेले अनेक लोक न्यायाधीश , जज असलेले आढळतात . दशम भाव हा आपली कर्मभूमी आहे कारण निसर्ग कुंडलीत दशम भाव शनीकडे आहे. मंगळ हा सेनापती आहे. युद्ध होते तेव्हाच सेनापती आपले कौशल्य दाखवू शकतो , त्याला नुसताच बसवून ठेवला तर त्याच्यातील शक्ती, जोम, उत्साह निघून जाईल आणि तो निराश होईल . म्हणूनच ह्या कर्माच्या मकर राशीत मंगळ उच्चत्व पावतो. रोज काहीतरी आपली नवनवीन स्कील , क्षमता दाखवण्याची संधी मंगळाला मकर राशीतच मिळते. बुध बालक आहे पण त्याच्याकडे गणित, संवाद, भाषा आहे. कन्या ही निसर्ग कुंडलीत षष्ठ भावात येणारी राशी आहे जिथे पोट आहे. पोटाची भूक शमवण्यासाठी अन्न लागते आणि ते मिळवण्यासाठी अर्थार्जन करण्यास माणूस काम करायला बाहेर पडतो. हे आपले रोजच्या नित्य व्यवहाराचे स्थान आहे. आपल्याला नोकरी आपल्या कौशल्याने गोड बोलूनच टिकवावी लागते. रोजच्या जीवनातील गणिते बिघडवून चालत नाही, रोज प्रत्येक क्षणी नवनवीन आव्हाने येत राहतात म्हणून ह्यात पारंगत बुध कन्या राशीत १५ अंशावर उच्च होतो. आप्तेष्ठांशी संबंध बोलण्यामुळेच जोडले किंवा तोडले जातात. प्रत्येक ग्रहाची आपल्या जन्मस्थ पत्रिकेत एक अवस्था असते त्याप्रमाणे त्याचे फलित असते. ते बदलत नाही. एखादा ग्रह लग्न कुंडलीमधे उच्च असेल पण त्यावर पापग्रहांची दृष्टी असेल किंवा नवमांश मध्ये तो बलहीन असेल तर अपेक्षित असणारी उच्च फळे मिळणार नाहीत . त्यामुळे पत्रिकेत एखादा ग्रह उच्च दिसला तर त्याचा सखोल अभ्यास आणि वरील सर्व गोष्टी तपासल्या शिवाय त्याबद्दल भाकीत केले तर चुकीचे ठरेल. ग्रह आणि आपले आयुष्य ह्यांचे मिळते जुळते नाते आहे जणू . ग्रह आपल्या आयुष्याचा भाग आहे आणि त्याचे परिणाम हे आपल्या पूर्व सुकृताचे प्रतिबिंब आहे.
हा अभ्यास सखोल आहे आणि तो करायचा कंटाळा नसावा नाहीतर फलादेश चुकेल. प्रत्येक राशीत सव्वा दोन म्हणजे ३ नक्षत्र येतात . त्या पैकी नक्षत्राच्या कुठल्या चरणावर ग्रह आहे आणि तोच ग्रह नवमांश मधेही कुठल्या स्थितीत आहे हा अभ्यास फलादेशाकडे नेणारा असतो. ग्रह फळ देतात ते त्यांच्या दशेत , अंतर्दशेत हेही विसरून चालणार नाही. जसे ३, ९, १२ ची दशा लागली तर भटकंती , प्रवास होतात . एखाद्या उच्च ग्रहाची दशाच आली नाही तर ? त्याची उच्च फळांची गोडी चाखता , अनुभवता येणार नाही . अंतर्दशेत काही प्रमाणात फळे मिळतील. एखादा ग्रह उच्च होतो तेव्हा तो त्या भावाची राशीची काहीतरी चांगलीच फळे प्रदान करेल पण ती किती प्रमाणात ? हाच अभ्यास आहे.
संपर्क : 8104639230