>> अस्मिता दीक्षित, ज्योतिष अभ्यासक
आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचा अवयव माझ्या मते “ जिव्हा “ म्हणजेच आपली जीभ. तिचा वापर अविचाराने केला तर सगळेच शून्य होईल. सध्याचे जग भावना शुन्य झाले आहे , माणसाला माणूस नको आहे . आधीच आपली माणसे कमी त्यात तोंडाने फटाफट बोलून आहे ती जोडायची की तीही घालवायची ते ज्याचे त्याने ठरवायचे .
पत्रिकेतील कुटुंब भाव हा आपल्या वाणीचा आहे. आपली भाषा ,स्वर , शब्दांचे स्वरूप सर्व काही येथील ग्रह आणि राशी सांगतात. शुक्र, चंद्र हे ग्रह नैसर्गिक शुभ ग्रह आहेत ते गोडवा जपणारे , माणसे जोडणारे आहेत . दुसरा भाव हा धनभाव तसेच कुटुंबाचाही भाव आहे. नैसर्गिक कुंडलीत इथे शुक्राचीच वृषभ राशी आलेली आहे. शुक्र आपल्या गोड वागण्या बोलण्याने माणसे जोडतो , नेमका हाच स्वभाव कुटुंबातील सर्वांचा असेल तर कुटुंब आणि त्यातील माणसे जोडून ठेवता येतील. शेवटी माणसातच देव आहे आणि माणसांशिवाय जगणे फोल आहे.
कुटुंब भावातील मंगळ हा अरेरावी , अहंकार हुकुमत वर्चस्व गाजवण्याची वृत्ती दर्शवेल , भाषा कडक शब्द दुखावणारे असतील. स्पष्ट बोलणे आणि फटकळ बोलणे ह्यातील फरक ह्यांना माहित नसतो. सर्व काही एकाच स्वरात असते म्हणूनच हे कुटुंब जपू शकत नाहीत . रवी कुटुंब भावात फारसा शोभत नाही कारण त्याच्या मान अपमानाच्या कल्पना प्रखर असतात . मन आपल्या वागण्याने मिळवायचा असतो तो असाच मिळत नाही . मिठ्ठास वाणी असलेले चंद्र शुक्र इथे लाखात एक शोभून दिसतात . अर्थात त्यांच्यावर कुठल्याही पापग्रहांची दृष्टी नसेल तरच . गुरु आकाश तत्वाचा सर्वाना सांभाळून घेणार.
राहू सारखा ग्रह इथे शिवराळ भाषा वापरेल. भावना वगैरे शून्य . केतू विरक्त आहे त्यामुळे केतू बडबड करणार नाही मोजकेच बोलणार पण बोलले तर कधी तोडूनही टाकतील. शनी असेल तर कुटुंबात वयाने वडील माणसे असतील आणि कुटुंब लहान असेल. शनी असेल तर व्यक्ती मितभाषी असेल. बुध असेल तर सतत बोलणे आणि सगळ्यांच्या संपर्कात राहणे . बुधासोबत राहू असेल तर खोटे बोलण्याकडे कल असू शकतो.
कुटुंब भावातील हर्शल हा आकस्मित बोलून केलेले सर्व घालवेल आणि नेपच्युन असेल तर ह्या लोकांचे बोलणे गूढ आणि बोलण्याचा नेमका अर्थ न समजणारे असते.
कमीतकमी शब्दात अधिक अपमान करणारी माणसे कुणालाही आवडत नाहीत . मुळात कशाला कुणाला दुखवा आणि प्रत्येक गोष्टी आपण आपले मन मांडलेच पाहिजे असे कुठे लिहिलंय का? नाही पण आम्ही बोलणार जिथे तिथे आम्ही आमचे शब्द भांडार उघडून बसणार आणि प्रत्येकाला रक्त बंबाळ करताच राहणार . असो.
हिंदी चित्रपट सृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन ह्यांची वाणी , भाषेवरील प्रभुत्व , उत्कृष्ठ शब्दफेक , स्वरातील माधुर्य एक ठेहराव आणि भावनीक ओलावा मनाला स्पर्शून जातो . ह्याचा जिवंत अनुभव आपण त्यांच्या KBC ह्या कार्यक्रमातून वेळोवेळी घेत असतो. त्यांच्या आवाजातील लय आणि बोलण्याची पद्धत व्यक्तीला त्यांच्याकडे आकर्षित करते . व्यक्तीची देहबोली महत्वाची आहे पण त्याहीपेक्षा वाणी अति महत्वाची आहे. रोजच्या जीवनात पदोपदी ह्याचा आपल्याला उपयोग करावा लागतो. चार गोड शब्द बोलून जे काम होते ते पैशाने सुद्धा किंवा अजून कश्यानेही होत नाही. जिभेवरची साखर नेहमीच आपल्याला माणसे जोडण्यात मदत करते. बच्चन ह्यांनी विविध भूमिका साकारताना भाषा आणि त्यातील चढ उतार स्वर ह्यांनी प्रेक्षकांच्या हृदयाचा ठाव घेतला आहे.
बुध हा बोलण्यातील माधुर्य तसेच चलाखी पण दर्शवतो , मंगळ हर्शल , बुध मंगळ , हर्शल नेप , शनी केतू ह्या युती अभ्यास करण्या सारख्याच आहेत . बुध राहू किंवा धनेश राहूच्या नक्षत्रात फसवणारा किंवा अर्धसत्य , गोड बोलून फसवणे दर्शवतो .
माणसाना दुखावून , टाकून बोलून आपल्याला काय मिळणार आहे ? माणसातील परमेश्वराला आपण दुखावतो आणि आपली स्वतःची कर्म वाढवून ठेवतो . परमेश्वर शेवटी माणसातच आहे. दिवसभराच्या आपल्या वागण्यात आपली सकाळची पूजा प्रतिबिंबित होणे अपेक्षित आहे , अगदी त्या देवालाही. त्यामुळे कितीही सत्कर्म आणि दानधर्म केला तरी सर्वश्रेष्ठ पूजा हि कुणाचेही मन न दुखावणे हीच आहे. आपण सहमत असालच.
संपर्क : 8104639230