>> अस्मिता दीक्षित, ज्योतिष अभ्यासक
राहू-केतूंबद्दल आपण भरभरून वाचत असतो, पण तरीही आपल्याला ते समजत नाहीत. कारण ते तसेच आहेत—व्यक्तीला भ्रमित करणारे, मायाजाल टाकून मोहात फसवणारे. क्षणात एक, तर क्षणात दुसरे अशी भासमान परिस्थिती निर्माण करणारे हे मायावी ग्रह अनेकदा माणसांवर कृपा करताना दिसतात, पण बहुतांशी स्थिती ही नकारात्मकच असते. 'माझी राहू-केतूची दशा/विदशा मस्त गेली' असे कुणीही तुम्हाला सांगणार नाही.
November Astro 2025: नोव्हेंबरची सुरुवात अत्यंत शुभ; आदित्य राजयोगात 'या' ८ राशींचा भाग्योदय
भ्रमंती करणारा हा राहू माणसाच्या मेंदूचा ठाव घेतो, त्याचा मेंदू आतून पोखरून टाकतो आणि मती गुंग होते. एखाद्याला परदेशाची वारी घडवेल, तर एखाद्याला तुरुंगाची हवा खायला लावेल. एकवेळ 'शनी परवडला' पण राहू मनाला, आत्म्याला ग्रहण लावतो, तेव्हा आयुष्य उद्ध्वस्त होते. आधुनिक जगतातील सगळे पत्ते स्वतःकडे ठेवणारा, AI चा जनक आणि बेमालूम राजकारण फिरवणारा, जगावर आणि माणसाच्या बुद्धीवर राज्य करणारा राहू, आज त्याचा थोडा विचार करूया.
अनेक पत्रिका पाहिल्यावर राहूचे अस्तित्व पत्रिकेत किती निर्णायक आहे, ते समजते. एकवेळ उपासना, परिणाम भोगण्याचे सामर्थ्य, मनोबल देतील; पण भोग हे भोगावेच लागणार—त्यातून कुणाचीच सुटका नाही.
हा राहू आपल्या पूर्वजांवर, घराण्यावर प्रकाश टाकणारा आहे. अनेकदा मागील पिढ्यांतील शाप, हाय-तळतळाट, वंशपरंपरागत होणारे आजार, वेड लागणे, अविवाहित राहणे, तसेच आपल्या पूर्व संचिताप्रमाणे आपल्याला भोगावे लागणारे भोग हे भोगावेच लागतात. राहत्या घरात भीती वाटणे, एकटे राहायला घाबरणे, वाहन चालवायची भीती वाटणे, घरात असलेल्या अशुभ शक्तींचा वावर, मन चक्रावून टाकतील अशा घटनांचा आयुष्यातील क्रम, विशेष करून राहूच्या दशेत ह्या सर्व मानवाच्या बुद्धीला न पेलणाऱ्या गोष्टी घडत असतात.
अनेक डॉक्टर झाले, हजारो रुपये खर्च झाले, पण 'आजार काहीच नाही' असे जेव्हा होते, तेव्हा काय करावे समजत नाही. त्या विध्यात्यासमोर नतमस्तक होण्याशिवाय पर्याय नाही.
वास्तूतील दोष, भिंतींचा ओलावा, वेड लागणे, एकाच ठिकाणी तासन्तास बसून राहणे, एक घास खूप वेळ झाला तरी चघळत राहणे, दाढी करायची नाही कारण दुखापत होईल हा भयगंड, अंघोळ करायची नाही कारण भीती, घरात/स्वप्नात साप दिसणे, वंश न वाढणे, आयुष्यात प्रगती नाही, ना धड नोकरी ना धड विवाह, आर्थिक संकटे, व्यसनाधीनता, अचानक चांगली नोकरी जाणे, नोकरीत राजकारण करून आपल्याला एकटे पाडले जाणे आणि मन अस्थिर होणे, सतत नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ लोकांकडून, सहकाऱ्यांकडून मानहानी, राजकारण, ग्रुपिझम (Groupism), मनासारखे काही न झाल्यामुळे सतत होणारी चिडचिड, एकटेपणा, आयुष्यातील सर्व सुखांना लागलेली जणू ओहोटी, घराण्यांची घराणी खुंटलेली आपण बघतो, निपुत्रिकपणा, असलेली संतती त्रासदायक निघणे, समाजात पत जाणे, अकाली मृत्यू आणि मृत्युपश्चात गती न मिळणे. गेलेल्या लोकांचे श्राद्धकर्म, दिवसवार न करणे आणि त्याला विज्ञानाची जोड देत आधुनिकतेचा दावा करणे हे अत्यंत न शोभणारे आणि संकटे ओढवून घेणारे कर्म आजकाल लोक करताना आपण बघतो. तेव्हा त्यावेळी त्यांच्या पुढील पिढ्यांना काय समोर वाढून ठेवले आहे, ते त्यांना माहीत नाही, असे सांगावेसे वाटते. पण ऐकणार कोण?
Kushmanda Navami 2025: आज कुष्मांड नवमीला आवळा किंवा भोपळा दान केल्याने मिळते अक्षय्य पुण्य!
एका पत्रिकेत राहूने व्यक्तीचा इतका ताबा घेतलेला दिसला की काय बोलावे समजेना. व्यक्ती २४ तास फोनवर, मेसेज सतत बघणे, फोन स्क्रोल करत राहणे. जेवतानासुद्धा फोन शेजारी चालू, अत्यंत कुकर्म, कुणाचे चांगले बघवत नाही, काट्या लावणे, प्रचंड हुशारी पण नको तिथे, राजकारणात हुशार पण त्याचा उपयोग आयुष्यात काहीही नाही, पदरी शेवटी बदनामी आणि आजार. दुर्लक्षित, अपमानित आयुष्य. घरात लक्ष नाही, सतत बाहेर भटकंती. ह्याचे त्याला, त्याचे ह्याला हे करून मिळणार काय? ह्याचा शेवट काय असेल, ते मी वेगळे सांगायची गरज नाही. पुढील कित्येक जन्माचे भोग ह्याच जन्मात व्यक्तीने तयार करून ठेवले आहेत. राहूच्या कब्जात असल्यामुळे अत्यंत हीन दर्जाचे राजकारण खेळण्यात व्यक्ती माहीर. असो. मोबाईल, इन्स्टा, सोशल मीडिया राहूच आहे. त्याचा किती, कसा वापर करायचा ते शेवटी आपल्या हातात आहे. राहूने दिलेला अति आत्मविश्वास कधी नेस्तनाबूत करेल, सांगता येणार नाही.
राहू-केतू अदृश्य शक्ती आहेत. आपल्याला नेमके काय होते आहे, कसली भीतीदायक स्वप्ने पडत आहेत, ते कुणाला सांगताही येत नाही इतकी भयानक असतात. हे भोग आपले आपल्यालाच भोगावे लागतात. ह्या अघोरी शक्ती अनेकदा त्यांच्या वासना आपल्याकडून भोगून घेताना दिसतात, जसे अचानक व्यसनाधीनता, बाहेरख्यालीपणा... अशा अनेक गोष्टी ज्या व्यक्ती करते. राहू बेमालूमपणे आपला डाव साधतो, त्यामुळे राहू दशेत कुणावर विश्वास ठेवू नये. आपल्या आजूबाजूची प्रत्येक व्यक्ती ही राहू आहे. समाजात कमी वावरावे, कमी बोलावे, सोशल वावर कमीतकमी असावा; कारण आपल्या कुठल्या शब्दाचा कोण कसा अर्थ लावून विपर्यास करेल, सांगता येत नाही. 'माणसाची ओळख आपल्याला शून्य आहे' हे राहू दाखवतो. मनातसुद्धा येणार नाही अशा व्यक्ती फसवतील, आपल्याबद्दल समाजकारण करतील; त्यामुळे खरंतर अनेक बाबतीत राहूला आपण धन्यवाद दिले पाहिजेत. असो.
विवाह मुहूर्त: २०२५-२६ मध्ये ४९ दिवस विवाह मुहूर्त; खरोखरच करावी लागणार लगीन 'घाई'
परवा एक पत्रिका पाहिली, चतुर्थात राहू-चंद्र युती. चतुर्थ भाव म्हणजे आई, वाहन सुख, वास्तू. सगळीकडेच ह्या व्यक्तीला भोग आहेत. चंद्र म्हणजे मन आणि मनाला ग्रासणारा राहू. विंचू जसा दगडाला घट्ट विळखा घालतो, तसा तो मेंदूला आणि आपल्या आयुष्यालाही घट्ट धरून ठेवतो. त्याच्या ताब्यात आपल्याला ठेवतो. फसवणूक म्हणजे राहूचे अगदी आवडते काम आहे. आपण किती सहज फसवले गेलो आहोत, हे आपले आपल्याला जेव्हा समजते, तेव्हा मती गुंग होते. किती हुशार समजत होतो आपण स्वतःला! पण राहूच्या चलाखीपुढे कसली हुशारी आणि कसले ज्ञान. एका फटक्यात असा काही गैरसमज निर्माण करतो की आयुष्यभराची नाती तुटतात. कुणाला आणि किती समजावणार? 'काय झाले? अचानक लोक का बोलत नाहीत? आपल्याला का टाळतात?' हे काहीच समजत नाही आणि मन उदास, निराश होत जाते; तब्येत खराब होते, आयुष्यातील आनंदाला आपण पारखे होतो. कशाचेच उत्तर मिळत नाही. राहू हा पूर्वजन्माचे शाप दर्शवतो आणि ते भोगावेच लागतात. आपण त्यापासून पळून जाऊ शकत नाही.
राहू ज्या भावात असतो, त्या भावाचे; ज्या ग्रहाच्या युतीत असतो, तसेच जिथे दृष्टी टाकतो, तिथले सुख हरपते. राहू-केतूच्या दशा, अंतर्दशेत शक्यतो विवाह करू नये; ठरला तर चालेल, असे माझे व्यक्तीशः मत आहे. राहू-शुक्र युती प्रेमविवाह दर्शवते, पण ते प्रेम कधी विरून जाते समजत नाही. अचानक विवाहसुख हरवते, विवाह मोडतो आणि घटस्फोट होतो. अडचणींची शृंखला—आपला जणू अंत पाहणारी राहूची दशा ज्यांनी भोगली आहे, त्यांना विचारा! सगळ्याच अंतर्दशा वाईट जाणार नाहीत, पण एकंदरीत दशा सुख देत नाही. राहू मनात सतत भीती, भयगंड ठेवतो. राहू दशेत व्यक्ती सतत दडपण घेऊनच जगते.
षष्ठ भावात राहू असेल, तर अनाकलनीय दुखणी-आजार होतात, ज्याचे निदान होत नाही आणि अनेकदा ते आजार शेवटपर्यंत माणसाची सोबत करतात. पैसा असो अथवा अजून काही, आपण ग्रहांना, ईश्वरी शक्तींना "manage" नाही करू शकत. आपण सर्व त्यांच्या ताब्यात आहोत, ते आपल्या नाहीत, हेच वास्तव आहे.
राहू-केतू मानवी जीवनात प्रचंड उलथापालथ करणारे पातबिंदू आहेत. कुणाचे आशीर्वाद नाही घेतले तरी चालतील, पण शाप/हाय घेऊ नये, इतकेच सांगावेसे वाटते. मागच्या जन्मात जे झाले, ते निस्तरता येणार नाही; पण आता निदान आत्ताचा/पुढील जन्म तरी आपले वर्तन, बुद्धी चांगल्या कामात उपयोगाला आणावी. आपले आपले जगावे, कुणाची निंदा-नालस्ती का करावी आणि संकटे का ओढवून घ्यावी? परमेश्वराचे चिंतन आणि सद्गुरूंचा जप हा आपला आधार आहे आणि महाराजांचे चरण घट्ट धरून ठेवा, इतकेच सांगावेसे वाटते.
"नासे रोग हरे सब पीडा... जपत निरंतर हनुमत बिरा..."
श्रीरामाचा जप करून हनुमान चालीसा नित्य पठण केले, तर धीर येतो, भीती कमी होते. उपाय सगळे विचारतात, पण किती आत्मीयतेने ते करतात, त्यावर त्याची फलश्रुती आहे.
संपर्क : 8104639230
Web Summary : Rahu-Ketu create illusions, causing life's upheavals and health issues. Ancestral curses manifest as problems. Remedies include Hanuman Chalisa recitation and spiritual practices for relief from negative influences, fostering inner peace and strength to navigate life's challenges.
Web Summary : राहु-केतु भ्रम पैदा करते हैं, जिससे जीवन में उथल-पुथल और स्वास्थ्य समस्याएं होती हैं। पैतृक शाप समस्याओं के रूप में प्रकट होते हैं। नकारात्मक प्रभावों से राहत के लिए हनुमान चालीसा का पाठ और आध्यात्मिक अभ्यास आंतरिक शांति और जीवन की चुनौतियों का सामना करने की शक्ति को बढ़ावा देते हैं।