>> अस्मिता दीक्षित, ज्योतिष अभ्यासक
विवाह जुळवताना 'गुण मिलन' ही पहिली पायरी आहे . गुण मिलन करणे आवश्यक आहे, परंतु फक्त गुण जुळले म्हणून विवाह करावा असे मात्र नाही. गुण मिलनात अनेक गोष्टींचा उलगडा होत नाही त्यासाठी आपल्याला ग्रहमिलन करावे लागते. दोघांच्याही पत्रिका व्यवस्थित अभ्यासून त्यांचे एकमेकांशी जुळणारे विचार, आर्थिक स्थैर्य , वैवाहिक आयुष्य , वैवाहिक समाधान, आयुष्य मर्यादा , जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन, कौटुंबिक सौख्य , विवाह टिकवण्यासाठी असलेले प्रत्येकाचे योगदान, तशी मानसिकता ,संतती सौख्य अशा अनेक गोष्टींचा परामर्श ग्रह मिलन करून समजतो जो गुण मिलनात होत नाही. गुण मिलन आणि ग्रह मिलन करून आलेले स्थळ योग्य आहे ना? याचा विचार केला जातो. इतरही काही गोष्टी आहेत जसे “ गोत्र'' . सगोत्र विवाह करू नये! अर्थात त्यासाठी शास्त्रात अनेक गोष्टी सुचवल्या आहेत अनेक नियम दिलेले आहेत .
गुण मिलन आणि ग्रहमिलन हे व्यवस्थित केले तर पुढे मनोमिलन होण्यास वेळ लागणार नाही . एकमेकांना समजून घेण्याची वृत्ती दोन्ही पत्रिकात असेल तर जीवनात कितीही चढ उतार आले तरी काही समस्या येणार नाहीत. 'तू तू मै मै' होणार नाही . एखादी मुलगी आपल्या कुटुंबात रममाण होईल की नाही हे गुण मिलन करून समजत नाही म्हणून ग्रह मिलन म्हणजेच पत्रिकेचा सखोल अभ्यास आवश्यक आहे. गुण मिलन सुद्धा महत्वाचे आहे पण ती फक्त पहिली पायरी आहे हे प्रत्येकाने समजून घ्यायला हवे.
वैवाहिक सुखाचा कारक शुक्र, लग्नेश किती बलवान आहे , कुटुंब भाव आणि पंचम जो संतती सौख्याचा आहे, प्रणयाचा आहे त्याचे बलाबल काय आहे हे फक्त गुण मिलन करून समजणार नाही . आरे ला कारे करणे, म्हणजे संसार नाही . आपले मत असलेच पाहिजे नाहीतर आपली केरसुणी करून कोपऱ्यात ठेवतील, पण प्रत्येक वेळी आपल्याच मनासारखे झाले पाहिजे हा अट्टाहास नको. अशाने संसार होत नाही, ह्या सर्वाची उकल ग्रह मिलन करताना होते जाते .
वैवाहिक सुखाचा कारक शुक्र बिघडला असेल किंवा सौख्य प्रदान न करणाऱ्या नक्षत्रात असेल तर हे गुण मिलन करून समजणार नाही . दशा हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. विवाह , संतती , आरोग्य , परदेशगमन , वाहन सौख्य ह्या सर्व गोष्टी ठरवतात त्या दशा. दशा स्वामीचा “ ग्रीन सिग्नल “ असल्याशिवाय कितीही डोके आपटले तरी वरील गोष्टींची प्राप्ती होणे कठीण आहे. म्हणून विवाहाला पूरक दशा आहे का? आणि असल्यास विवाह ही घटना कधी घडेल हे काढता येते जे अर्थात गुण मिलन करून समजत नाही. अशा अनेक गोष्टी ह्या फक्त ग्रह मिलन करून समजतात त्याचा उलगडा होतो म्हणून गुण आणि ग्रह मिलन हे दोन्ही एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत आणि दोन्ही तितक्याच महत्वाच्या आहेत . गुण जमणे म्हणजे विवाह करावा असे नाही असे असते तर गुण जुळले म्हणून विवाह केलेले कोर्टाच्या पायर्या चढले नसते .
अनेकदा २७ किंवा ३२ गुण जुळतात म्हणून विवाह होतो आणि मग पुढे सगळेच बिनसत जाते . पत्रिका वरवर पाहू नका, अनेक प्रश्न जातकाने ज्योतिषालाही विचारून सर्व शंकांचे समाधान करून घ्यावे. ज्योतिषाने सुद्धा जीवनातील अडथळे , दोघांचे स्वभाव ह्याचे विश्लेषण करावे . उगीच कुणाच्या तरी गुड बुक मध्ये राहण्यासाठी खरे लपवून ठेवू नये. स्पष्ट सल्ला द्यावा जेणेकरून समोरच्या माणसाची मनाची तयारी होईल. तुझी बायको मस्त पैशाची उधळपट्टी करणार आहे रे बाबा, हे स्पष्ट सांगावे कारण तिच्या हाती पैसा टिकणे कठीण. शास्त्र जनमानसाच्या कल्याणासाठीच आहे . गुण मिलन आणि ग्रह मिलन ह्याचे एकत्रित महत्व आहे आणि त्याचे महत्व समजावे ह्या साठी हा लेखन प्रपंच .
संपर्क : 8104639230