Ayodhya Ram Lalla Mandir: २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत भव्य राम मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. रामललाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर कोट्यवधी भाविकांनी अयोध्येत जाऊन रामललाचे दर्शन घेतले. याच राम मंदिराच्या पहिल्या मजल्यावर श्रीरामांचा दरबारही पूर्ण झाला आहे. गेल्या महिन्यात म्हणजेच ५ जून रोजी अभिजित मुहूर्तावर राम मंदिर संकुलातील इतर ७ मंदिरांमध्ये विधिवत प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला. यातच आता पुन्हा एकदा अयोध्येत रामललांसाठी अस्सल सागवानी लाडकाचे खास भव्य मंदिर बांधले जाणार आहे.
योध्येतील राम मंदिराचे लोकार्पण होऊन दीड वर्ष उलटून गेले, तरी भाविकांची राम दर्शनाची आस अद्यापही कमी झालेली नाही. आजही अयोध्येत लाखो भाविक राम मंदिराच्या दर्शनासाठी येत आहेत. सन २०२५ च्या अखेरपर्यंत राम मंदिर परिसरातील सर्व कामे पूर्ण होणार असल्याचे म्हटले जात आहे. तसेच भव्य राम मंदिर होण्यापूर्वी भगवान राम ज्या ठिकाणी विराजमान होते, त्या तात्पुरत्या मंदिराच्या जागी भव्य मंदिर बांधले जाणार आहे. राम मंदिर ट्रस्ट तेथे अस्सल सागवानी लाडकाचे मंदिर बांधणार आहे.
गेल्या ५०० वर्षांचा इतिहास भाविकांना कसा सांगायचा याचा विचार
अयोध्येच्या राम मंदिरात विराजमान असलेल्या रामलला यांच्या तात्पुरत्या निवासाच्या ठिकाणी बांधण्यात येणारे मंदिर सागवान लाकडाचे बनलेले असेल. यासाठी महाराष्ट्रासह परदेशातील काही देशांमधून लाकूड आणले जाणार आहे. सागवानी लाकडाचे मंदिर एक वर्षांपर्यंत मजबूत राहू शकते, असे म्हटले जाते. यामुळेच आता भगवान राम तात्पुरत्या मंदिरात विराजमान होते, त्या ठिकाणी सागवान लाकडाचे मंदिर बांधले जाईल. नृपेंद्र मिश्रा म्हणाले की, भारतीय पुरातत्व खात्याने तात्पुरत्या मंदिरात भगवान रामलला इतकी वर्ष विराजमान होते, त्या जागेचे सर्वेक्षणही केले आहे. जुने तात्पुरते मंदिर कुठे आहे, ते कसे जतन करायचे आणि गेल्या ५०० वर्षांचा इतिहास भाविकांना कसा सांगायचा याचा विचार केला जात आहे. रामभक्तांसाठी लवकरच तेथे भव्य मंदिर बांधले जाईल, असे मिश्रा यांनी सांगितले. हे काम हैदराबादस्थित आंतरराष्ट्रीय फर्निचर कंपनी अनुराधा टिंबरला देण्यात आले आहे. या कामासाठी कन्याकुमारी येथून खास कारागीर बोलावले जाणार आहेत, असेही म्हटले जात आहे.
दरम्यान, अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राला २०२४-२५ मध्ये विविध स्त्रोतांकडून ३१६.५७ कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न मिळाले आहे. विशेष म्हणजे या काळात श्रीराम मंदिर प्रकल्पाशी संबंधित बांधकाम कामावर सर्वाधिक ४५० कोटी रुपये खर्च करण्यात आले. अयोध्येतील राम मंदिराला पैशांच्या स्वरुपात आणि सोने-चांदी स्वरुपात दान करणाऱ्या भाविकांची यादी हजारोंच्या घरात आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राला आपले नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवरून एका भाविकाने महादान दिले आहे. मुंबईतील एका उद्योजकाने राम मंदिराला सुमारे १७५ किलो सोने दान केले आहे. या सोन्याची किंमत सुमारे १५० कोटींच्या घरात असल्याचे म्हटले जात आहे.