माउलींना निरोप दिल्यानंतर पांडुरंगानेही मार्गशीर्ष मासात 'या' मंदिरात घेतली महिनाभर विश्रांती!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2023 11:29 AM2023-12-12T11:29:01+5:302023-12-12T11:31:34+5:30

माउली आपले अवतार कार्य संपवणार हे पांडुरंगालाही सहन झाले नाही, म्हणून त्यानेही आडोसा शोधून महिनाभर विश्रांती घेतली ते हे ठिकाण!

After saying goodbye to Mauli, Panduranga also rested for a month in this temple in the month of Margashirsha! | माउलींना निरोप दिल्यानंतर पांडुरंगानेही मार्गशीर्ष मासात 'या' मंदिरात घेतली महिनाभर विश्रांती!

माउलींना निरोप दिल्यानंतर पांडुरंगानेही मार्गशीर्ष मासात 'या' मंदिरात घेतली महिनाभर विश्रांती!

रोजच्या कामातून थकवा येतो, म्हणून आपण आठवड्यातून किमान एक दिवसाची रजा घेतो. परंतु जो विश्वाचा चालक परमेश्वर आहे, त्यालाही कधीतरी विश्रांती घ्यावीशी वाटत असेलच ना? अशावेळी देवही सहलीसाठी, विश्रांतीसाठी किंवा दोन क्षण विरंगुळा मिळावा यासाठी कुठे जात असतील का? वास्तव आपल्याला माहित नाही, परंतु भोळ्या भाविकांनी याच कल्पनेतून देवासाठी एक विश्रांती स्थान योजून ठेवले. त्याचे नाव आहे, विष्णुपद मंदिर. यामागे आणखीही काही कथा सांगितल्या जातात. त्याचे सविस्तर वर्णन पंढरपूरचे आशुतोष अनिलराव बडवे पाटील यांनी केले आहे. 

पंढरपूर नगरीच्या अग्नेयेला साधारण १.५ किमी अंतरावर असणाऱ्या गोपाळपूर जवळ नदिपात्रात पुष्पावती आणि चंद्रभागा नदीच्या संगमस्थानी हे पुरातन मंदिर आहे. ७ फूट जोत्यावर १२ फूट उंचीचे ३१ x ३१ फूट आकारमानाचे, तसेच १६ दगडी खांबांवरचे २४ कमानी वर हे दगडी मंदिर उभारले आहे. त्याच्या एका बाजूला मोठा दगडी सप असून त्याचे बाजूस पुरातन मारूतीही अुभा आहे. भक्तगण या सपाचा वापर भोजनासाठी विसाव्यासाठीही करतात. जवळच नदिपात्रात नारदमुनींचे मंदिर आहे. कारण त्यांचे मुखी पुंडलिककिर्ती ऐकून त्याचे भेटीसाठी गोपांसह येणाऱ्या देवाला पुढे राहून तेच मार्ग दाखवित होते. 

इथे असणाऱ्या, संगम दैत्य शिलातली |
गुप्त जाणोनि वनमाळी, वरि उभा राहोनी ते वेळी |
केला तली शतचूर्ण || 

तै श्रीकृष्णाची समपदे | तैसीच गोपाळाची पदे | 
अद्यापी दिसती विसींदे | मोक्षपदे देकिल्या||  

याप्रमाणे कृष्णाची पदे असणाऱ्या या मध्यवर्ती स्थानी सर्वत्र असणाऱ्या मुर्तीप्रमाणे इथे मात्र मुर्ती नसून भगवंताच्या पायाच्या चिखलात रूतलेल्या पदचिन्हांची पुजा करण्यात येते. भगवान कृष्णाची या ठिकाणी समचरण आणि देहुडा चरण दोन्हि पदचिन्हे असून तेथेच लोण्याची वाटी, मुरली ठेवल्याच्या खुणा तसेच गाईंच्या खुराच्याही खुणा या पदचिन्हांशेजारी पुजेत आहेत. एवढेच नाही- तर सोबतच्या गोपालांची ही पदे इथे उमटलेली आहेत. 

हिंदु संस्कृतीत जेवढे महत्व गयेला तेवढेच किंबहुना त्याहुन थोडे जास्त या स्थानाला आहे. कारण गयेला भगवंताचे एकाच पायाची खुण आहे. इथे मात्र दोन्ही पायाच्या खुणा आहेत. त्यामुळे इथे पूर्वजांचे मोक्षप्राप्तीसाठी श्राद्धादि कर्मेहि केली जातात. तसेच संगमस्थान असल्याने नारायण नागबळी सारखी धर्मकृत्येही करण्यात येतात

कृष्णावतारात भगवंताने आपल्या गोप गोपिका सवंगड्यांसह रम्य क्रिडा करून 
तव धावोनी आले गोवळ | म्हणती खवळला जठरानल | 
कृष्णा भूक लागली प्रबल | भुकेचि वेळ न सोसवे ||  

याप्रमाणे जिथे काला केला ते हे स्थान. या काल्याची महती मोठी कारण 
गगनभरे सुरश्रेणी | बैसोनिया विमानी |
काला पाहती नयनी | दिव्य सुमनी वर्षती ||
म्हणती धन्य धन्य गोवळजन | धन्य धन्य वृक्ष पाषाण | 
धन्य धन्य ते स्थान | जग्जीवन जेथ क्रिडे|| 

असा येथला महिमा अनेक संतांबरोबरच  संत प्रल्हाद महाराज बडवे यांनीहि वर्णिला आहे. तसेच भगवंताने येथे वेणु नाद केल्याने याला वेणुक्षेत्र असेहि म्हणतात. पुरातन काली असलेल्या पदचिन्हांसाठी  संत धामणगांवकर ( म्हणजे बहुधा बोधले महाराज असावेत) यांनी सन १६४० मधे येथे पार बांधला. त्यानंतर सन १७८५ मधे चिंतो नागेश बडवे यांनी सांप्रत असणारे सुंदर दगडी मंदिर बांधले आहे. 

श्रीपूरचे आगाशे हे प्रतिमास अमावस्येला पंढरपूरला दर्शनाला येत असत. एका मार्गशीर्ष अमावस्येला देवाचा रथ मंदिराकडे वाजत आलेला पाहिल्यावर त्यांनी याबाबत चौकशी करून विष्णुपद दर्शन केले. आणि त्यांनी नदिपात्रात जाण्यासाठी चा बळकट असा दगडीपूल आणि फरसबंदी रस्ता, घाट यांची बांधणी केली. त्यामुळे भक्तांची नदिपात्रात चालणेची वणवण संपली.

आळंदीला माऊलींनी समाधी घेतली त्याला भगवंत उपस्थित होते. आपल्याला आता भक्तभेटी नाही या विचाराने भगवान उदास झाले त्यामुळे आळंदीहून आल्यावर त्यांनी पंढरी ऐवजी इथे वास्तव्य केले. म्हणून समस्त गावकरी मार्गशीर्ष महिन्यात नित्य तर वारकरी त्यांचे सवडीने इथे देवदर्शनार्थ येतात. भगवंताने इथे गोप जनांसह काला केला त्याचे स्मरण म्हणून सहभोजनही होते. मास समाप्तीला देवाला पुन्हा वाजत गाजत रथातून मिरवत मंदिरात आणले जाते. 

Web Title: After saying goodbye to Mauli, Panduranga also rested for a month in this temple in the month of Margashirsha!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.