Adhik Maas 2020: स्वस्तिक चिन्ह काढा दारी, भगवान विष्णू येतील घरी
By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: October 3, 2020 07:49 IST2020-10-03T07:43:35+5:302020-10-03T07:49:43+5:30
Adhik Maas 2020: अधिक मासात भगवान विष्णूंच्या पूजनार्थ 'स्वस्तिक व्रत' केले जाते.

Adhik Maas 2020: स्वस्तिक चिन्ह काढा दारी, भगवान विष्णू येतील घरी
ज्योत्स्ना गाडगीळ
अधिक मास हा पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जातो. पुरुषोत्तम अर्थात भगवान महाविष्णू. त्यांच्या पूजनार्थ चातुर्मासात 'स्वस्तिक व्रत' केले जाते. यंदा अधिक मास, चातुर्मासात आला आहे. म्हणून या व्रताचे विशेष महत्त्व आहे.
स्वस्तिक व्रत कसे करावे?
स्वस्तिक हे शांती, समृद्धी व मांगल्य यांचे प्रतीक आहे. म्हणून अनेक सौभाग्यवती चार्तुमासात स्वस्तिक व्रत करतात. या व्रतात रोज स्वस्तिक काढून त्याची पूजा करायची असते. चातुर्मासात मंदिरात भगवंताजवळ स्वस्तिक व अष्टदळाची रांगोळी काढणाऱ्या स्त्रीला वैधव्याचे भय राहत नाही, असे पद्मपुराणात म्हटले आहे.
घराच्या उंबरठ्यावर स्वस्तिक काढण्यामागेही हिच सद्भावना असते की, `देवा, माझ्या घरात जे काही अन्न, वस्त्र इ. वैभव येईल ते पवित्र राहो. अधर्माने प्राप्त केलेले वैभव जीवनात अनर्थ निर्माण करते. बाहेरून हसरे पण आंतून रडते जीवन मला मान्य नाही. म्हणून सर्व अनिष्ट गोष्टी घराबाहेर राहून घरात मांगल्य नांदावे, यासाठी स्वस्तिक रेखाटत आहे.'
हेही वाचा : Adhik Mass 2020: तन्नो विष्णू: प्रचोदयात।; श्री विष्णूंचे पाच श्लोक ठरतील पुण्यफलदायी
स्वस्तिक शब्दाचा अर्थ:
सु+अस्ति म्हणजे चांगले, कल्याणमय, मंगल आणि अस् म्हणजे सत्ता, अस्तित्व. स्वस्ति म्हणजे कल्याणाची सत्ता, मांगल्याचे अस्तित्त्व आणि त्यांचे प्रतीक म्हणजे स्वस्तिक.
विष्णूपूजेत स्वस्तिकाचे महत्त्व :
धर्मशास्त्राचे गाढे अभ्यासक पांडुरंगशास्त्री आठवले, स्वस्तिक चिन्हाचा अर्थ समजावून सांगतात, `स्वस्तिकाच्या चार भुजा म्हणजे भगवान महाविष्णूंचे चार हात. भगवान विष्णू आपल्या चार हातांनी चार दिशांचे पालन करतो. भगवंताचे चारही हात मला सहाय्य करणारे आहेत, तशाच चार दिशा मला माझ्या कार्यक्षेत्राची कक्षा सांगतात.'
स्वस्तिक म्हणजे एक उभी रेषा आणि त्याच्यावर तेवढ्याच लांबीची दुसरी आडवी रेषा ही स्वस्तिकाची मूळ आकृती. उभी रेषा ही ज्योतिर्लिंगाचे दर्शन आहे. ज्योतिर्लिंग हे विश्वाच्या उत्पत्तीचे मूळ कारण आहे. तर, आडवी रेषा ही विश्वाचा विस्तार दाखवते. ईश्वरानेच हे विश्व निर्माण केले आणि देवांनी स्वत:ची शक्ती खर्च करून त्याचा विस्तार केला, असा स्वस्तिकाचा भावार्थ आहे.
स्वस्तिक हे भारतीय संस्कृतीचे अजोड प्रतीक आहे. कोणत्याही मंगल कार्याच्या आरंभी एक मंत्र म्हटला जातो,
स्वस्ति न: इंद्रो वृद्धश्रवा: स्वस्ति न पूषा विश्ववेदा:।
स्वस्ति नस्तारक्ष्र्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु।।
महान कीर्तीवान इंद्र आमचे कल्याण करो. विश्वाचा ज्ञानस्वरूप पूषादेव आमचे कल्याण साधो. ज्याचे शस्त्र अतूट आहे असा भगवान गरुड आमचे मंगल करो. असा या श्लोकाचा अर्थ आहे.
फक्त भारतातच नाही, तर विश्वातील अनेक देशात प्राचीन काळापासू स्वस्तिकाचे महत्त्व प्रस्थापित झाले आहे. असे सुमंगल स्वस्तिक आपल्या दारात रेखाटून भगवान विष्णूंचे स्मरण करूया, ऊँ नमो भगवते वासुदेवाय.
हेही वाचा : Adhik Maas 2020: अधिक मासात करूया ३३ सकारात्मक संकल्प