Ayodhya Ram Mandir News: अयोध्येतील श्रीराम मंदिरात जाऊन रामललाचे दर्शन घेण्याची ओढ किंचितही कमी झालेली दिसत नाही. अयोध्येत आजही दररोज लाखो भाविक येत आहेत. राम मंदिरात पहिल्या मजल्यावर राम दरबार तयार केला जात आहे. लवकरच याचे काम पूर्ण होणार आहे. रामललाच्या दर्शनासह श्रीरामांचा भव्य दरबार पाहण्याची संधीही भाविकांना मिळण्याची शक्यता आहे. केवळ भारतातून नाही, तर जगाच्या कानाकोपऱ्यातून भाविक, पर्यटक अयोध्येत येऊन रामललाचे दर्शन घेत आहेत. हनुमानगढीच्या महंतांना राम दर्शनाची एवढी ओढ लागली की, त्यांनी चक्क सुमारे ३०० वर्षांपासून चालत आलेली परंपरा मोडली. श्रीरामाचे दर्शन घेण्याच्या त्यांच्या इच्छेचा मान राखण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, अयोध्येतील हनुमानगढी येथे ३०० वर्षांनंतर एक परंपरा खंडित झाली. पीठाचे प्रमुख महंत प्रेम दास हे मंदिराबाहेर पडले. अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने महंतांनी मंदिराबाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि मंदिर परिसर सोडला. सुमारे ३०० वर्षांहून अधिक काळानंतर हनुमानगढीचे महंत मंदिरातून बाहेर पडण्याची ही पहिलीच वेळ आहे. महंत प्रेम दास यांना राम मंदिरात जाऊन रामललाचे दर्शन घेण्याची ओढ लागली होती. निर्वाणी आखाड्याने त्यांच्या इच्छेचा मान राखला आणि फक्त एकदा बाहेर जाण्यास परवानगी दिली. हनुमानगढी हे अयोध्येतील हनुमंतांचे सर्वांत सिद्ध मंदिर मानले जाते. राम मंदिरात जाण्यापूर्वी या मंदिरात जाऊन हनुमानजींचे दर्शन घेतले पाहिजे, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.
नेमकी परंपरा काय होती? न्यायालयानेही ठेवला मान
हनुमानगढीचे महंत संजय दास यांनी या परंपरेबाबत माहिती दिली. महंत संजय दास म्हणाले की, ही परंपरा गेल्या सुमारे ३०० वर्षांपासून पाळली जात आहे. स्वतःला भगवान हनुमानाला समर्पित करणे हीच महत्त्वाची भूमिका महंतांनी पार पाडायची आहे. एकदा पीठावर विराजमान झाल्यानंतर महंत त्याच मंदिराच्या परिसरातच आजीवन राहतो. त्याचा देह मृत्यूनंतरच बाहेर पडतो. काही प्रकरणात न्यायालयानेही या परंपरेचा मान राखला आहे. आवश्यकता असेल तेव्हा या आखाड्याचा एक प्रतिनिधी न्यायालयासमोर हजर होतो. १९८० मध्ये महंतांची साक्ष नोंदवण्यासाठी न्यायालयाने हनुमानगढी मंदिर परिसरातच सुनावणी घेतली होती, अशी माहिती दास यांनी दिली.
दरम्यान, महंत प्रेम दास मंदिरातून बाहेर पडले, तेव्हा नव्या भव्य राम मंदिराकडे जाताना एक शाही मिरवणूक काढण्यात आली. महंतांचे सर्व शिष्य आणि इतर भाविक त्यात सहभागी झाले होते. शेकडो वर्षांपूर्वी महंतांनी ही परंपरा सुरू केली होती की, महंत त्यांच्या हयातीत हनुमानगढी मंदिर परिसर सोडून कुठेही जाणार नाहीत.