Windy winds, rains in the Ganges storm | वादळी वारे, पावसाने गंगामसल्यात हाहाकार
वादळी वारे, पावसाने गंगामसल्यात हाहाकार

ठळक मुद्देमाजलगाव तालुक्यात वीज पडून ३ जणांचा मृत्यू । परिसरातील अनेक गावांमध्ये देखील मोठे नुकसान

माजलगाव : शुक्रवारी सायंकाळपासून रात्रीपर्यंत पावसाने धुमाकूळ घातल्याने मोठे नुकसान झाले. तर माजलगाव शहरात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून विजेच्या तारांवर कोसळल्याने मोठ्या प्रमाणात तारा तुटल्या त्यामुळे तालुक्याचा वीजपुरवठा २४ तासांपासून खंडित झालेला आहे.
तालुक्यातील गंगामसला येथे वादळी वाऱ्यामुळे अवघ्या दहा मिनिटात गावातील सुमारे सत्तर टक्के घरावरील पत्रे उडून गेले. अनेक घरांच्या भिंतीनां तडे गेले. काही घरांचे माळवद खचले. लोखंडी पोल जमीनदोस्त झाले. त्यामुळे संपूर्ण गावभर विजेच्या तारा आडव्या उभ्या पडलेल्या होत्या. गावातील ५० टक्के झाडांपैकी काही तुटून तर काही उन्मळून पडली. यामुळे राष्ट्रीय महामार्गापासून गावात जाणारा रस्ता पूर्णत: बंद झाला. तो शनिवारी दुपारपर्यंतच बंदच होता. घटना घडल्यानंतर रात्री येथील शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख सतीश सोळंके हे काही सवंगड्यांसह गावातील लोकांना धीर देत होते. तसेच प्रशासनाला देखील त्यांनी याची वेळीच कल्पना दिली होती अनेक जणांना औषधोपचारासाठी मदत केली.
पलंगामुळे वाचला चौघांचा जीव
तुफान वाऱ्यांमुळे घराच्या वरील तसेच बाजूने लावलेले पूर्ण पत्रे उडून गेले. त्यात गावातील उडालेले पत्रे अंगावर कोसळत असल्याने गणेश गाडे व शिवकन्या गाडे यांनी जीव वाचविण्यासाठी घरातील पलंगाखाली अस्मिता व चैतन्य या मुलांसह आश्रय घेतला. पाऊस थांबल्यानंतर शेजाºया पाजाºयांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांना पलंगाखालून सुरक्षित बाहेर काढण्यात आले.
वादळी वा-यात अनेक जण जखमी
तुफान पावसामुळे तसेच वाºयामुळे उडालेल्या पत्रे व दगडांमुळे अनेकजण जखमी झाले. अशोक पांढरे याच्या पायावर दगड पडल्याने त्याच्या पायाची नस तुटली. त्यांना बीड येथे उपचारासाठी पाठविले आहे. अर्चना कदम नामक महिला मानेला पत्रा लागल्याने गंभीर जखमी झाली. तसेच भालचंद्र सोळंके यांच्या डोक्याला पत्र्याचा मार लागला आहे. गणपत लांडगे यांच्या घरावर झाड पडल्याने ते जखमी झाले. तसेच रमेश पंडित, मुक्तीराम तावडे, महादेव पंडित, बाळासाहेब कदम, प्रकाश कदम, गंगुबाई लगड, तुळसाबाई धोंडे, एकनाथ धरपडे, शकील पठाण, तुकाराम सोळंके, वैजनाथ कदम आदी वादळी वाºयाच्या फटक्याने जखमी झाले आहेत. तसेच यमुनाबाई व त्यांचे पती हरिभाऊ सोनटक्के या वृद्ध जोडप्याचे संपूर्ण घर पडले.
वादळी पावसाने घेतले तिघांचे बळी
वादळी पावसामुळे तालुक्यातील नागडगाव येथील अंजली खामकर वय २५ हिचा शेतातून परत येत असताना वीज अंगावर पडून मृत्यू झाला. महातपुरी येथील पांडुरंग कचरूबा जामकर यांचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला. तसेच माजलगाव शहरातील फुलेनगर भागात राहणाºया आश्रफबी गणी सय्यद या ६० वर्षीय महिलेचा अंगावर भिंत कोसळून मृत्यू झाला.


Web Title: Windy winds, rains in the Ganges storm
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.