बीड: बीड जिल्ह्यातील लिंबागणेश परिसरात पवनचक्की प्रकल्पावर मध्यरात्री घडलेल्या गोळीबाराच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. चोरीच्या उद्देशाने आलेल्या चोरट्यांवर सुरक्षा रक्षकांनी गोळीबार केल्याने एका चोरट्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती असून अन्य चोरटे फरार होण्यात यशस्वी झाले आहेत. ही घटना नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास घडली.
प्राथमिक माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे २ वाजेच्या दरम्यान काही अज्ञात व्यक्तींनी प्रकल्पस्थळी चोरीच्या उद्देशाने प्रवेश केला. ही बाब तेथे तैनात सुरक्षारक्षकाच्या लक्षात आली. चोरट्यांना थांबवण्याच्या प्रयत्नात सुरक्षारक्षकाने गोळीबार केला. गोळी लागल्यामुळे एक चोरटा जागीच ठार झाला, तर इतर आरोपी फरार झाले आहेत. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून, पोलीस अधिक तपास करत आहेत. घटनास्थळी पोलिसांनी तातडीने धाव घेत पंचनामा केला असून, संबंधित सुरक्षा रक्षकाची देखील चौकशी सुरू आहे.
पवनचक्की प्रकल्प पुन्हा चर्चेतबीडमधील पवनचक्की प्रकल्प गेल्या काही महिन्यांपासून वादग्रस्त ठरले आहेत. खंडणी, फसवणूक, वाद-विवाद आणि गुन्हेगारीमुळे या प्रकल्पांकडे वारंवार लक्ष वेधले जात आहे. या घटनेने त्या चिंतेत अधिक भर टाकली आहे. स्थानिक नागरिकांकडून प्रकल्पस्थळी अधिक कडक सुरक्षा उपाययोजनांची मागणी केली जात आहे.