बीड : सरपंच संतोष देशमुख व दोन कोटी रूपये खंडणी मागितल्याच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या वाल्मीक कराड हा शरण येण्याच्या आदल्या दिवशी बीड तालुक्यातील मांजसुंब्यातील ढाब्यावर जेवला. त्यानंतर आलिशान कारमधून पुण्याला गेला आणि तेथे ३१ डिसेंबर २०२४ रोजी शरण आला. आदल्या दिवशीचे रात्रीचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले आहेत. त्यामुळे खळबळ उडाली आहे. दुसरीकडे या प्रकारावर संतोष देखमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी सवाल केला. जे व्हिडीओ, सीसीटीव्ही फुटेज मीडियाच्या हाती लागतात ते तपास करणाऱ्यांच्या हाती का लागत नाहीत, असा सवाल धनंजय देशमुख यांनी उपस्थित केला आहे. तसेच तपासाची माहिती दिली जात नसल्याचा आरोप त्यांनी पुन्हा केला.
वाल्मीक कराडवर आगोदर खंडणीचा गुन्हा दाखल होता. नंतर देशमुख हत्या प्रकरणातही कटात सहभाग आढळल्याने त्याच्यावर मकोका लावला. याच प्रकरणात त्याला मंगळवारी बीडच्या न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. या प्रकरणात आतापर्यंत आठ आरोपी अटक असून नववा आरोपी कृष्णा आंधळे अजूनही मोकाट आहे. पोलिसांनी त्याला वाॅन्टेड घोषित केले आहे. दरम्यान, मंगळवारीच वाल्मीक कराडसह सर्वच आरोपी हे विष्णू चाटे याच्या कार्यालयात एकत्रित आल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर बुधवारी कराड हा बीड जिल्ह्यातूनच पुण्याला गेल्याचे सांगण्यात येत आहे. धाराशिव जिल्ह्यातील पारगाव टोलनाक्यावरील आणि एका पेट्रोल पंपवारील कथित सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले आहेत. हे फुटेज ३० डिसेंबर २०२४ रोजीचे असल्याचे सांगण्यात येत असून दुसऱ्याच दिवशी तो पुण्यात सीआयडीला शरण आला होता. त्यामुळे कराडला फरार असताना जिल्ह्यातील कोणी कोणी मदत केली, याची माहिती सीआयडी घेत आहे.
पोटात दुखले, रुग्णालयात दाखलखंडणीच्या गुन्ह्यात दाखल केलेला जामीन अर्ज वाल्मीक कराडकडून बिनशर्त मागे घेण्यात आला आहे.न्यायालयीन कोठडी होताच मंगळवारी मध्यरात्री वाल्मीक कराड याच्या पोटात दुखायला लागले. बीड कारागृहातून त्याला जिल्हा रुग्णालयात १२:४५ वाजता दाखल केले. पोटाची सोनोग्राफी करण्यासह रक्त व इतर तपासण्या केल्या. यात त्याला लघवीचा संसर्ग झाल्याचा संशय व्यक्त केला. कराड हा बुधवारी दुपारपर्यंत मिनी आयसीयूममध्ये उपचार घेत होता. वॉर्डच्या बाहेर तगडा बंदोबस्त तैनात होता. उपचार सुरू असल्याची माहिती प्र.जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय राऊत यांनी दिली.