बीड : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित दादा पवार यांच्या अकाली निधनामुळे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद सध्या रिक्त झाले आहे. १८ जानेवारी २०२५ रोजी पदभार स्वीकारल्यापासून दादांनी जिल्ह्यात जो विकासाचा आणि प्रशासकीय शिस्तीचा धडाका लावला होता, तो वारसा पुढे नेण्याचे मोठे आव्हान आता नव्या पालकमंत्र्यांसमोर असेल. या रिक्त पदावर कोणाची वर्णी लागणार, याबाबत राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
अजित पवारांकडे उपमुख्यमंत्रिपदासह अर्थ मंत्रालय आणि क्रीडा खात्याचाही पदभार होता. माणिकराव कोकाटे वादग्रस्त ठरल्यानंतर क्रीडा खाते दादांकडेच आले होते. आता त्यांच्या निधनानंतर ही महत्त्वाची खाती कोणाला मिळणार, याकडे राज्याचे लक्ष आहे. विशेष म्हणजे, यातील एखादे मंत्रिपद बीड जिल्ह्याला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसे झाल्यास राष्ट्रवादीमधील (अजित पवार) धनंजय मुंडे, प्रकाश सोळंके किंवा विजयसिंह पंडित यांच्या नावावर चर्चा होऊ शकते. मुंडे आणि सोळंके यांनी यापूर्वी मंत्री म्हणून काम केलेले आहे. तर पंडित पहिल्यांदाच आमदार झाले आहेत.
पंकजा मुंडे की बाहेरील मंत्री?महायुतीमधील अंतर्गत समीकरणे पाहता पंकजा मुंडे यांच्या नावावरही चर्चा होऊ शकते. मात्र, पंकजा मुंडे सध्या जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री आहेत. जर एकाच मंत्र्याकडे दोन जिल्ह्यांचे पालकत्व द्यायचे नसेल, तर बाहेरच्या मंत्र्यांकडे बीडची जबाबदारी जाऊ शकते. पंकजा मुंडे यांच्याकडे दोन्ही जिल्ह्यांचे पालकत्व किंवा जालना येथील कमी करून बीडचे पालकमंत्रिपद देण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, यापूर्वी अतुल सावे यांनी बीडचे पालकत्व सांभाळले होते. तसेच, नुकतेच २६ जानेवारी २०२६ रोजी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी बीडमध्ये ध्वजारोहण केले होते. त्यामुळे या दोन्ही नावांची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
दोनवेळा केले मुख्य शासकीय ध्वजारोहणजिल्ह्यातील मुख्य शासकीय ध्वजारोहण हे पालकमंत्र्यांच्या हस्ते पार पडत असते. परंतु, अजित पवार यांच्याकडे पुण्याचेही पालकत्व असल्याने, २६ जानेवारी २०२५ रोजी बीडमध्ये मंत्री दत्ता भरणे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले होते. त्यानंतर १ मे रोजी मंत्री इंद्रनील नाईक यांनी ध्वजारोहण केले. पुढे १५ ऑगस्ट आणि १७ सप्टेंबर २०२५ रोजी स्वतः अजित पवार यांनी उपस्थित राहून शासकीय ध्वजारोहण केले होते. तर नुकतेच, २६ जानेवारी २०२६ रोजी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.
Web Summary : Ajit Pawar's passing leaves Beed without a guardian minister. Speculation surrounds potential successors: Dhananjay Munde, Prakash Solanke, or even Pankaja Munde. External ministers like Atul Save or Babasaheb Patil are also possibilities, creating political buzz.
Web Summary : अजित पवार के निधन से बीड में संरक्षक मंत्री का पद खाली। धनंजय मुंडे, प्रकाश सोलंके या पंकजा मुंडे संभावित उत्तराधिकारी। अतुल सावे या बाबासाहेब पाटिल जैसे बाहरी मंत्री भी दौड़ में, राजनीतिक चर्चा ज़ोरों पर।