स्वागतार्ह कारवाई! बीडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक होतोय बॅनरमुक्त

By सोमनाथ खताळ | Published: January 31, 2024 04:09 PM2024-01-31T16:09:05+5:302024-01-31T16:11:36+5:30

बीड शहरात सध्या फुकटात चमकोगिरी करणाऱ्यांची संख्या वाढली आहे

Welcome action! Chhatrapati Shivaji Maharaj Chowk is becoming banner-free in Beed | स्वागतार्ह कारवाई! बीडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक होतोय बॅनरमुक्त

स्वागतार्ह कारवाई! बीडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक होतोय बॅनरमुक्त

बीड : शहरातील सर्वात वर्दळीच्या असणारा छत्रपती शिवाजी महाराज चौक बॅनमुक्त हाेत आहे. बुधवारी सकाळपासूनच बीड नगर पालिका आणि पाेलिसांनी संयूक्त मोहिम राबवित सर्व बॅनर हटविण्यास सुरूवात केली आहे. सध्या छोटे बॅनर काढणे चालू असून, वाहतूक कमी झाल्यास रात्रीच्यावेळी मोठे बॅनर काढले जाणार आहेत. सर्व बॅनर हटविल्याने चौकाने माेकळा श्वास घेतला आहे. आता यापुढे येथे कोणाचेही बॅनर लागणार नाही, याची काळजी प्रशासनाने घेण्याची गरज आहे.

बीड शहरात सध्या फुकटात चमकोगिरी करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. वाढदिवस, कार्यक्रम, जयंती, उत्सव आदींच्या अनुषंगाने सर्रासपणे चौक, रस्ते, दुभाजक या ठिकाणी अनाधिकृतपणे बॅनर लावले जाते. यामुळे शहर विद्रूप हाेत चालले आहे. शिवाय वाहतूकीसह अडथळा निर्माण हाेत आहे. याबाबत तक्रारी प्राप्त होताच पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी शहरातील मुख्य चौक बॅनरमुक्त करण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना सुचना केल्या. त्याप्रमाणे बुधवारी सकाळपासूनच बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील बॅनर हटविण्यास सुरूवात झाली. जे मोठे बॅनर आहेत, ते रात्रीच्या सुमारास वाहतूक कमी झाल्यास हटविले जाणार आहेत. या कारवाईने सामान्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर, पोलिस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ, मारूती खेडकर, मुख्याधिकारी निता अंधारे, स्वच्छता निरीक्षक भागवत जाधव, मुन्ना गायकवाड आदींनी केली.

सर्वच बॅनर हटवणार
बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक व आण्णाभाऊ साठे चौक सध्या बॅनरमुक्त करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सर्वच बॅनर हटविले जाणार आहेत. जे मोठे बॅनर आहेत ते रात्रीच्यावेळी हटविले जातील. दिवसा हटविल्यास अपघात होण्याची शक्यता असते.
नीता अंधारे, मुख्याधिकारी न.प.बीड

प्रामाणिक कारवाई व्हावी

बीड शहरातील बॅनर काढताना सरसकट काढणे अपेक्षित आहे. काही लोकांचे बॅनर राहिले आणि काहींचेच काढले तर असे चालणार नाही. कारवाईत दुजाभाव व्हायला नको. आमचे प्रशासनाला सहकार्यच असेल, पण कारवाईमध्ये प्रामाणिकपणा असावा.

- सचिन मुळूक, जिल्हाप्रमुख शिवसेना बीड

Web Title: Welcome action! Chhatrapati Shivaji Maharaj Chowk is becoming banner-free in Beed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.