बीड - मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आजची सुनावणी संपली असून येत्या २४ तारखेला या प्रकरणी सुनावणी घेण्यात येणार आहे. आजच्या सुनावणीत सरकारी विशेष वकिलांकडून काही कागदपत्रे सादर करण्यात आली. त्यात देशमुखांच्या मारहाणीचा व्हिडिओ कोर्टात दिला आहे. परंतु हा व्हिडिओ बाहेर प्रसिद्ध होऊ नये, जर झाला तर त्यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशी विनंती संतोष देशमुखांच्या बाजूने युक्तिवाद करणारे ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी कोर्टात केली.
आजच्या सुनावणीबाबत उज्ज्वल निकम यांनी म्हटलं की, न्यायालयाने आरोपींना त्यांचे म्हणणं मांडायला सांगितले आहे. येत्या २४ एप्रिलला त्यावर सुनावणी होईल. आजच्या सुनावणीत आरोपी वाल्मीक कराडची चल-अचल संपत्ती जप्त करण्यात यावी असा अर्ज कोर्टात दिला आहे. त्यावर वाल्मीककडून खुलासा दाखल करण्यात आला नाही. त्यानंतर यावर रितसर सुनावणी होईल. वाल्मीक कराडने कोर्टात अर्ज दाखल केला असून मी खूनात नाही, खंडणी मागितली नाही. मी कसा निर्दोष आहे असा केविलवाणा प्रयत्न केला आहे असं दिसून येते असंही निकम यांनी सांगितले.
"वाल्मीक कराडची संपत्ती जप्त करा"
तसेच सीआयडीने काही महत्त्वाची कागदपत्रे गोळा केली आहे. कराडसोबत इतर आरोपींच्या संपत्तीची चौकशी सुरू आहे. पुढील तपास सुरू असल्याने पूर्ण तपास झाल्यानंतर संपत्तीबाबत निर्णय घेण्यात येईल. मकोका कायद्यातंर्गत कराडची संपत्ती जप्त करावी असा अर्ज आम्ही दिला आहे. कोर्टात पुरावे नोंदवले जातील असं निकम यांनी म्हटलं आहे.
आजच्या सुनावणीत काय घडलं?
दरम्यान, आरोपी वाल्मीक कराडने कोर्टात अर्ज दाखल करून माझा या गुन्ह्याशी काही संबंध नाही त्यामुळे मला यातून मुक्त करावे अशी मागणी करणारा अर्ज आज कोर्टात दाखल केला. जेव्हा देशमुख यांची हत्या झाली, त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. हा व्हिडिओ कोर्टाकडून सुरक्षित ठेवण्यात आला आहे या २ महत्त्वाच्या घटना सुनावणीत घडल्या आहेत.