केज : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी दोन दिवस पोलिस कोठडीत असलेल्या विष्णू चाटेला सोमवारी केज न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्याला १८ जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
विष्णू चाटेला खंडणीप्रकरणी १८ डिसेंबरला बीडजवळ अटक केली होती. त्यानंतर सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी त्याला पोलिसांनी अटक केली होती. केज येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्या. कुणाल जाधव यांनी त्याला दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. सोमवारी त्याची पोलिस कोठडी संपल्यानंतर त्याला केज येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात हजर केले असता न्या. कुणाल जाधव यांनी त्याला १८ जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
सातही आरोपी सोबत हजर करणार
सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या केल्याच्या आरोपाखाली पोलिस कोठडीत असलेले ६ आरोपी व न्यायालयीन कोठडीत असलेला विष्णू चाटे या सातही आरोपीना १८ जानेवारीला एकत्र केज येथील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्यानंतर सर्वांना एकत्र बसवून त्यांची एकत्र चौकशी करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.