बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून ९ डिसेंबर २०२४ रोजी निर्दयीपणे हत्या केली. त्याचा व्हिडीओ बनवला. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. हे प्रकरण राज्यभर गाजल्यानंतर बीडमधील अनेक व्हिडीओ समोर आले. त्यातच आठवडाभरात पुन्हा एकदा जिल्ह्यात तीन ठिकाणी अपहरण करून मारहाणीच्या घटना घडल्या आहेत.
परळीतील गुन्हेगारीच्या घटनेत एका टोळक्याने मारहाणीचा व्हिडीओ तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी कारवाई केली असली तरी गुन्हेगारांमध्ये एवढी हिंमत येतेच कोठून, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मारहाण करून व्हिडीओ व्हायरल करण्याचा हा नवीन पायंडा तयार होत असून, या माध्यमातून गुन्हेगार परिसरात आपली दहशत निर्माण करू लागले आहेत.
९ डिसेंबर २०२४ रोजी वाल्मीक कराडच्या गँगने मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या केली.
शिरूर तालुक्यातील खोक्या भोसले याने एका व्यक्तीला अर्धनग्न करून बेदम मारहाण केली.
संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांचे साडू दादा खिंडकर यानेही एका तरुणाला बेदम मारहाण केली होती.