बीड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी बीड शहरातील तीन परीक्षा केंद्रांना ‘सरप्राइज व्हिजीट’ दिली. या ठिकाणी ३६ कॉपीबहाद्दर आढळले असून, त्यांचा ‘संपूर्ण परफॉर्मन्स रद्द’ करण्याचे आदेश कुलगुरू डॉ. फुलारी यांनी परीक्षा संचालकांना दिले आहेत.
विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षांना मंगळवारपासून (दि.२९) सुरुवात झाली आहे. विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विजय फुलारी यांनी पहिल्याच दिवशी शहरातील बलभीम महाविद्यालयात १५, ‘केएसके’त १५ आणि आदित्य व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयात ७ विद्यार्थी कॉपी करताना आढळून आले आहेत. या विद्यार्थ्यांची उत्तरपत्रिका घेण्यात आली असून, संपूर्ण परीक्षेचा परफॉर्मन्स रद्द करण्याचे आदेशही कुलगुरूंनी दिले. यावेळी भरारी पथकातील डॉ. सतीश दांडगे, डॉ. भास्कर साठे उपस्थित होते. पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी बलभीम महाविद्यालयात ४२८, केएसके महाविद्यालयात १७८ तर आदित्य व्यवस्थापन शास्त्र महाविद्यालयात ३३७ असे एकूण १ हजार ३ विद्यार्थी परीक्षा देत आहेत.
परीक्षा केंद्रात अनेक त्रुटी, सुविधांचा अभावपदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा केंद्रांवर विद्यापीठाच्या नियमाप्रमाणे व्यवस्था केल्याचे आढळले नाही. तसेच तिन्ही ठिकाणी विद्यार्थी सर्वांत वरच्या मजल्यावर बसविले होते. ‘स्ट्राँग रूम’मध्ये सीसीटीव्ही, झेरॉक्स मशीन नसल्याचे दिसून आले. याबद्दल कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी संबंधित केंद्र प्रमुखांना विचारणा केली.
महाविद्यालयात प्राचार्य गैरहजरकुलगुरू केएसके महाविद्यालय पोहोचले तेव्हा प्राचार्य डॉ. शिवानंद क्षीरसागर यांच्यासह सहकेंद्र प्रमुख महाविद्यालयात पोहोचलेले नव्हते. बलभीम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष उंदरे हे कुलगुरूंना भेटलेच नाही. आदित्य व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयाचे संपूर्ण केंद्रच विस्कळीत होते. प्राचार्य नव्हते. विद्यापीठाच्या नियमाप्रमाणे बैठक व्यवस्था करण्यात आलेली नव्हती. प्रश्नपत्रिका एका ठिकाणी डाउनलोड केल्या जात हाेत्या तर दुसऱ्या ठिकाणी झेरॉक्स काढण्यात येत होत्या. या गंभीर प्रकारांमुळे कुलगुरूंनी परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉ. भारती गवळी यांना विद्यापीठाच्या नियमाप्रमाणे कारवाई करण्याची सूचनाही दिल्या आहेत.
दुसऱ्या, तिसऱ्या मजल्यांवर परीक्षातिन्ही परीक्षा केंद्रांना कुलगुरूंनी भेट दिल्यानंतर दुसऱ्या, तिसऱ्या मजल्यावर विद्यार्थ्यांना बसविण्यात आले होते. त्याशिवाय आदित्य महाविद्यालयात तर केंद्र दाखविले एक आणि परीक्षा केंद्र दुसऱ्याच ठिकाणी घेण्यात येत असल्याचे कुलगुरूंच्या निदर्शनास आले. यावर जाब विचारण्यासाठी प्राचार्यच महाविद्यालयात हजर नसल्याचे सांगण्यात आले.