केज : मेहुणीच्या लग्नासाठी गावी आलेला राज्य राखीव दलातील जवान सोमवारी रात्री पत्नीला घेऊन स्कुटीवरून केजकडे येत होते. केज-मांजरसुंभा राज्य महामार्गावरील सावंतवाडी टोल नाक्याजवळ पाठीमागून दुचाकीवर आलेल्या तीन चोरट्यांनी स्कुटीला दुचाकी आडवी लावत गळ्यातील सोने, मोबाइल व नगदी ऐवज असा एकूण ८४ हजार रुपयांच्या मुद्देमालाची लूट केली. सदर प्रकार सोमवारी रात्री सव्वाआठ वाजण्याच्या सुमारास घडला. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
केज तालुक्यातील सांगवी येथील सोमेश गोरख धस हा पुणे येथे राज्य राखीव दलात शिपाई या पदावर कार्यरत आहे. तो चार दिवसांपूर्वी त्याच्या मेव्हणीच्या लग्नासाठी गावी आला होता. ९ ऑगस्ट रोजी सोमेश धस हा त्याची पत्नी स्नेहलसोबत स्कुटीवरून सांगवी (सारणी) येथून केजकडे येत असताना रात्री ८.१५ वाजताच्या सुमारास मांजरसुभा-केज महामार्गावरील सावंतवाडी टोलनाक्याजवळ पाठीमागून दुचाकीवर आलेल्या तिघांनी सोमेश धस यांच्या स्कूटीला दुचाकी आडवी लावल्याने सोमेशने स्कुटी उभी केली. दुचाकीवरील एकाने स्कुटीची चावी काढून घेतली तर दोघांनी स्नेहलच्या हाताला धरून ओढत बाजूच्या उसाचे शेतात नेले असता स्नेहल आरडा ओरडा करू लागल्याने तीस ओरडू नको म्हणून तिला मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. पत्नीला मारहाण होत असल्याने सोमेशने त्याना प्रतिकार केला असता एकाने त्याचे हात धरले असता सोमेशने त्याच्या हाताच्या करंगळीला व छातीला जोराचा चावा घेतल्याने तिघानी सोमेश धस याच्या तोंडावर, डोक्यात आणि पाठीवर दगडाने मारून मुकामार दिल्यानंतर दोघांनी स्नेहलच्या जवळ जाऊन तिच्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे सोन्याचे मिनीगंठण काढून घेतले. तसेच रिअल-मी कपनीचा १८ हजार रुपया किमतीचा मोबाइल आणि नगदी ६ हजार रुपये काढून घेतले.
या तीन संशयितापैकी एक जाड व रंगाने काळा असून, त्याच्या अंगात पांढरा शर्ट आणि काळ्या रंगाची पॅंट आहे तर दुसरे दोघेजण सडपातळ असून एकाच्या अंगात पांढरा शर्ट व पांढऱ्या रंगाची पॅंट होती. दुसऱ्याच्या अंगात केशरी रंगाचे शर्ट आणि पांढरी पॅंट असल्याची माहिती मिळाली आहे.
या प्रकरणी सोमेश धस यांच्या तक्रारीवरून केज पोलीस ठाण्यात अज्ञाता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे हे करीत आहेत.
घटनेची माहिती मिळताच प्रभारी डीवायएसपी लगारे, पोलीस निरीक्षक मिसळे, डीबी पथकाचे दिलीप गित्ते यांनी घटनास्थळाला भेट दिली. तसेच उस्मानाबाद येथील श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. सावंतवाडी टोल नाक्याजवळ असलेल्या कच्या रस्त्याचा फायदा घेत चोरटे वाहनाचा वेग कमी झाल्यानंतर त्यांना लुटत असल्याचे प्रकार सातत्याने घडू लागले आहेत. यापूर्वीही अशा लुटीच्या घटना या टोलनाक्याजवळ घडल्या आहेत.