बीड/नेकनूर : मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पवनचक्की कंपन्यांची चर्चा झाली होती. आता पुन्हा एकदा या कंपनीच्या ठिकाणी गुरुवारी मध्यरात्री थरार पाहायला मिळाला. काही लोक चोरीच्या उद्देशाने प्रकल्पावर आले. त्यांना सुरक्षारक्षकांनी पाहिल्यानंतर त्यांच्यावर दगडफेक, गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. प्रत्युत्तरात सुरक्षारक्षकानेही गाेळ्या झाडल्या. यात कुख्यात गुन्हेगाराचा मृत्यू झाला. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत नेकनूर ठाण्यात नोंद झाली नव्हती.
बीड तालुक्यातील नेकनूर पोलिस ठाणे हद्दीतील लिंबागणेश सर्कलमध्ये ओटू रिन्यूएबल एनर्जी ही कंपनी पवनचक्कीचे काम करत आहे. या प्रकल्पाच्या ठिकाणावरील साहित्य चोरून नेण्यासाठी काही लोक आले होते. परंतु, तेवढ्यात प्रकल्पाचे सुरक्षारक्षक रुकसीन टाक यांनी त्यांना पाहिले. त्यांना हटकून अडविण्याचा प्रयत्न केल्यावर काही चोरट्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. तसेच, दगडफेकही केली. त्यानंतर टाक यांनीही त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आपल्याजवळील बंदुकीतून गोळ्या झाडल्या. यात चोरांच्या टाेळीतील एकाचा छातीत गोळी लागल्याने जागीच मृत्यू झाला. ही घटना समजताच नेकनूर पोलिसांनी धाव घेतली. मृतदेह नेकनूर रुग्णालयात आणण्यात आला होता.
गोळीबाराची घटना भीतीपोटी लपवलीगुरुवारी रात्री २० ते २५ चाेरटे आल्याचा कॉल प्रकल्पातून नेकनूर पोलिसांना आला. त्यानंतर तातडीने पोलिसांचे वाहन तेथे पाेहोचले. परंतु, त्याआधीच सर्व पसार झाले होते. त्यामुळे पोलिस तेथून निघून आले. सकाळी १० वाजता एकाचा मृतदेह तेथे दिसला. त्यानंतर पोलिसांनी धाव घेत चौकशी सुरू केली. सुरक्षारक्षकाला बोलावून घेत चाैकशी केल्यावर गोळीबारात एकाचा मृत्यू झाल्याचे उघड झाले. सध्या तरी टाक या रक्षकाला ताब्यात घेतले आहे. भीतीपोटी ही घटना सांगितली नसल्याचे रक्षकांनी पोलिसांना सांगितले.
मयतावर १८ गुन्हेगोळीबारात राजू ऊर्फ चिचा विष्णू काळे (वय २४, रा. तुळजापूर, जि. धाराशिव) हा मयत झाला. त्याच्याविरोधात चोरीचे १८ गुन्हे दाखल आहेत. यात पवनचक्कीच्या काही गुन्ह्यांचाही समावेश आहे.चोर आल्याची माहिती मिळताच रात्री आमचे लोक पोहोचले होते. परंतु, तेथे कोणी नसल्याने परत आले. सकाळी चौकशी केल्यावर गोळीबार आणि मयताची माहिती समोर आली. सुरक्षारक्षकाला ताब्यात घेतले आहे.- चंद्रकांत गोसावी, सहायक पोलिस निरीक्षक नेकनूर