केज/परळी (जि. बीड) : भावाची हत्या झाल्यानंतर रुग्णवाहिका कळंबकडे नेली जात होती. कळंबमध्ये एक महिला तयार होती. तिला पैसे देऊन छेडछाडीचा आरोप करायचा आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याचा प्लॅन होता; परंतु ग्रामस्थांनी पाठलाग केल्याने हा प्लॅन फसला, असा आरोप मृत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी मंगळवारी केला.
खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी देशमुख व परळीतील महादेव मुंडे कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना धनंजय देशमुख म्हणाले की, ग्रामस्थांनी पाहिले नसते तर हत्या प्रकरणाला अनैतिक संबंधाचे वळण दिले असते. अशा अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाबाबत आमच्या मागण्या २५ फेब्रुवारीपर्यंत मान्य करा, अन्यथा सामूहिक अन्नत्याग आंदोलन करण्यावर ठाम आहोत, अशी भूमिका यावेळी मस्साजोग ग्रामस्थांनी मांडली.
महादेव मुंडे यांची पत्नी उपोषणावर ठाम
परळीतील महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांच्याशीही खा. सुळे यांनी चर्चा केली. आरोपींना अटक का होत नाही, असा प्रश्न ज्ञानेश्वरी मुंडे यांनी खा. सुळे यांच्यासमोर उपस्थित केला.
खा. सुळे यांनी फोनवरून जिल्हा पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांच्याशी संवाद साधला. आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी आपण उपोषण करण्यावर ठाम असल्याचे ज्ञानेश्वरी मुंडे यांनी यावेळी सांगितले.
सत्ता अन् पैशाची मस्ती उतरली पाहिजे : खा. सुळे
सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची क्रूरपणे हत्या करणारा आरोपी कृष्णा आंधळे हा ७१ दिवसांपासून फरार आहे.
हे कशाचे द्योतक आहे? असा प्रश्न उपस्थित करून बीड जिल्ह्यातील सत्ता आणि पैशाची मस्ती उतरली पाहिजे, असे म्हणत खा. सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला. सामूहिक अन्नत्याग आंदोलन करू नका, असे आवाहनही खा. सुळे यांनी यावेळी गावकऱ्यांना केले.