केज: खंडणी प्रकरणातील वाल्मीक कराडला खून प्रकरणात सहआरोपी करून त्याच्यावर मकोका लावावा, अशी मागणी करत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांच्यासह ग्रामस्थांनी मस्साजोग येथील जलकुंभावर चढून आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान, आंदोलनस्थळी मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पोहचले असून त्यांनी धनंजय देशमुख यांच्यासह ग्रामस्थांना खाली उतरण्याची विनंती केली आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे दिवसा ढवळ्या अपहरण करून त्यांची अतिशय निर्दय पणे व क्रूरतेने हत्या करण्यात आली त्याला ३५ दिवस झाले तरीही कृष्णा आंधळे ( रा. मैंदवाडी) हा आरोपी अद्यापही मोकाटच आहे. आंधळे याला तत्काळ अटक करावी. तसेच वाल्मीक कराड याच्यावर फक्त खंडणीचा गुन्हा दाखल आहे, त्याला संतोष देशमुख यांच्या खुनाच्या प्रकरणात सहआरोपी करून मकोका लावावा अशी मागणी भाऊ धनंजय देशमुख यांनी केली आहे.
शिडी काढून टाकलीआंदोलनस्थळी पोलिस दाखल झाले आहेत. पोलिसवर जात असताना आंदोलक ग्रामस्थांनी जलकुंभावर जाण्यासाठीची शिडी काढून टाकली आहे. तसेच महिला आणि ग्रामस्थांनी खाली ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
मनोज जरांगे पोहचले, सरकारला इशारा दरम्यान, आंदोलनस्थळी मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पोहचले आहेत. संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांच्यासह आंदोलक ग्रामस्थांना जरांगे यांनी खाली उतरण्याची विनंती केली. मुख्यमंत्र्यांनी योग्य कारवाई करावी. त्यांनी आरोपींना पाठीशी घालू नये. त्यांच्या शब्दांवर देशमुख कुटुंबावर विश्वास ठेवला. पण त्यांनी कारवाई केली नाही. सर्व माहिती असतानाही कुटुंबावर अशी वेळ येत असेल तर हे एक षडयंत्र आहे. यांना मोबाईल सापडत नाही, फरार आरोपी सापडत नाही, कराडवर मकोका लावला नाही, यामुळे सरकार विरोधात आता समाजाला जोरदार आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जरांगे यांनी यावेळी दिला.
प्रमुख मागण्या...वाल्मिक कराडवर मकोका लावून, सरपंच हत्येत त्याला सह आरोपी करा, मोकाट कृष्णा आंधळेला अटक करा शासकीय वकील म्हणून ऍड उज्वल निकम किंवा सतीश मानशिंदे यांची नियुक्ती करा, एस आय टी त पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांची नियुक्ती करा, तपासाची माहिती देशमुख कुटुंबियांना द्या, पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन याला बडतर्फ करून सहआरोपी करा.या मागण्याचे निवेदन गावाकऱ्यांनी तयार केले आहे.