आष्टी : बीड जिल्ह्यातील ४५ वर्षांपुढील दिव्यांगबांधवांनी ५ जून रोजी विशेष लसीकरण मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन शासनमान्य महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र लाड यांनी केले आहे.
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या २५ मे रोजीच्या संदर्भीय पत्रान्वये ५ जून रोजी दिव्यांग बांधवांना कोविड-१९ च्या लसीकरणासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी बीड जिल्ह्यातील दिव्यांगबांधवांसाठी विशेष लसीकरण कार्यक्रम निश्चित केला असून या दिवशी फक्त ४५ वर्षावरील दिव्यांग बांधवाचे लसीकरण सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत होणार आहे. यासाठी त्यांना कुठल्याही ऑनलाईन नोंदणीची गरज नाही. लसीकरणास जाताना दिव्यांगबांधवांनी दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र व आधारकार्ड सोबत घेऊन जावे. या दिवशी फक्त दिव्यांग बांधवांचे लसीकरण होणार असल्याने इतर सर्वसामान्य व्यक्तींचे लसीकरण बंद राहणार आहे. लसीकरणादरम्यान काही अडचणी आल्यास रवींद्र शिंदे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी व डाॅ. सचिन मडावी, सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण बीड यांना संपर्क करावा व जास्तीत जास्त दिव्यांगबांधवांनी विशेष लसीकरण मोहिमेत सहभागी होऊन लसीकरण करून घेण्याचे आवाहन दिव्यांग कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष महादेव सरवदे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र लाड,जिल्हासचिव इंद्रजित डांगे,मधुकर अंबाड,नंदकिशोर मोरे,बाळासाहेब सोनसळे,दत्तात्रय गाडेकर,शेषराव सानप,नवनाथ लोंढे, संजिवनी गायकवाड, वैशाली कुलकर्णी आदींनी केले आहे.