परळी : परळी आणि सिरसाळा येथे अनधिकृतपणे सुरू असलेल्या बेकायदेशीर गोवंश हत्येच्या विरोधात गोरक्षण सेवा संघाच्या वतीने ३ मार्चपासून परळी नगरपरिषद कार्यालयासमोर बळीराम परांडे, दीपक जोशी, विजय बडे या तिघांनी बेमुदत उपोषण सुरू केले होते. या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी आज सकाळी शहरात मुकमोर्चा काढण्यात आला.
शहरातील राणी लक्ष्मीबाई टॉवरपासून नगर परिषद कार्यालयापर्यंत हा मूक मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये महिला पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गोवंश हत्येच्या निषेधार्थ घोषणांचे फलक हातात घेऊन शहरातून मोर्चा नगरपालिका कार्यालयासमोर उपोषण स्थळी आला. या ठिकाणी मुख्याधिकारी त्रिंबक कांबळे यांनी आंदोलकांच्या मागण्या जाणून घेत लेखी आश्वासन दिले. तसेच पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी फोनवरून उपोषणकर्त्यांशी व मुख्याधिकारी कांबळे यांच्याशी संवाद साधला. मुख्याधिकाऱ्यांनाही योग्य ती कारवाई करण्याची सूचना मंत्री पंकजा मुंडे यांनी केली. त्यानंतर दुपारी उपोषण स्थगित करण्यात आले.
या आहेत आंदोलकांच्या मागण्या- परळी व सिरसाळा बेकायदेशीर कत्तलखाने तत्काळ बंद करावेत.- परळी शहरात जनावरांसाठी अधिकृत कोंडवाडा सुरू करण्यात यावा.- गोवंश मास विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कठोर कारवाई करण्यात यावी.
परळी शहरातील मुख्य रस्त्यावरील व उघड्यावरील मास विक्री बंद करणेबाबत सूचना देऊन नोटीसा बजाविण्यात आल्या आहेत. काही ठिकाणचे अवैध कत्तलखाना पत्रे ठोकून बंद करण्यात आले. चार दिवसांत स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट प्राप्त होईल, त्यानुसार कारवाई करण्यात येईल असे आश्वासन मुख्याधिकारी त्रिंबक कांबळे यांनी आंदोलकांना दिले.