बीड : केज तालुक्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी जयराम माणिक चाटे याला जिल्हा न्यायालयाने दिलासा दिला आहे. त्याचे दिवंगत बंधू श्रीराम चाटे यांच्या १२ व्या दिवसाच्या धार्मिक विधीसाठी मकोका विशेष न्यायाधीश व्ही. एच. पाटवदकर यांनी पोलिस बंदोबस्तात उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे.
आरोपी जयराम चाटे याचा धाकटा भाऊ श्रीराम चाटे यांचे २ मार्च २०२६ रोजी तांबवा (ता. केज) येथे निधन झाले. श्रीराम हे वयाच्या सहाव्या वर्षांपासून दिव्यांग होते. हिंदू रीतीरिवाजांनुसार १२ व्या दिवसाचा विधी अत्यंत महत्त्वाचा असल्याने, या विधीला उपस्थित राहण्यासाठी जयरामने जिल्हा न्यायालयाकडे परवानगी मागितली होती. कुटुंबातील हा महत्त्वाचा विधी असून, आरोपी सर्व अटींचे पालन करण्यास आणि पोलिस बंदोबस्ताचे शुल्क भरण्यास तयार असल्याचे आरोपीच्या वकिलांनी न्यायालयास सांगितले.
सहायक सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी या अर्जाला विरोध दर्शवला होता. आरोपीवरील गुन्हे गंभीर स्वरूपाचे असून, त्याला बाहेर सोडल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा दावा सरकारी पक्षाने केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर, न्यायाधीशांनी मानवतावादी दृष्टिकोन समोर ठेवला. ‘भावाचा मृत्यू झाला असून, धार्मिक विधी पार पाडणे आवश्यक आहे, ही बाब लक्षात घेता आरोपीला परवानगी देणे योग्य ठरेल,’ असे न्यायालयाने आपल्या आदेशात नमूद केले .
न्यायालयाने असे दिले निर्देश-वेळ व ठिकाण : १३ मार्च २०२६ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४ या वेळेत केज तालुक्यातील तांबवा येथे विधीसाठी हजर राहता येईल.
-पोलिस बंदोबस्त : बीडच्या जेल अधीक्षकांनी आवश्यक एस्कॉर्ट आणि शुल्काची पूर्तता करून आरोपीला पोलिस बंदोबस्तात नेण्याची व्यवस्था करावी. विधी संपल्यानंतर आरोपीला तत्काळ कारागृहात परत नेण्यात यावे.-सहकार्य : आरोपी आणि त्याच्या नातेवाइकांनी पोलिस पथकाला पूर्ण सहकार्य करावे, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
Web Summary : Jayram Chate, accused in the Santosh Deshmukh murder case, was granted permission by the court to attend his brother's religious ceremony under police escort. The court considered the humanitarian aspect and the importance of the ritual.
Web Summary : संतोष देशमुख हत्याकांड के आरोपी जयराम चाटे को अदालत ने पुलिस सुरक्षा में अपने भाई के धार्मिक कार्यक्रम में शामिल होने की अनुमति दी। अदालत ने मानवीय पहलू और अनुष्ठान के महत्व पर विचार किया।