केज ( बीड) : तालुक्यातील मस्साजोग येथील आवादा ऍनर्जी कंपनीच्या अधिकाऱ्यांना 2 कोटी रुपयाची खंडणी मागून त्यांना जीवे मारण्याच्या दिलेल्या धमकी प्रकरणी 15 दिवसाच्या पोलीस कोठडीत आसलेल्या वाल्मिक कराडला मंगळवारी दुपारी केज येथील न्यायालयात हजर केले आसता, दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीश दिशांत गोळे यांनी त्याला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी मिळण्या आधीच वाल्मिक कराड याचा सरपंच संतोष देशमुख हत्येत सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाल्यामुळे त्याला मकोका लावण्यासाठी सीआयडी आणि एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठाकडे अहवाल पाठविला होता. वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी मिळताच वाल्मिक कराडला मकोका लागल्या मूळे पुढील तपास करण्यासाठी त्याला आमच्या ताब्यात देण्यात यावे. असा अर्ज 'एसआयटी'च्या अधिकाऱ्यांनी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश कुणाल जाधव यांच्याकडे केला. याला न्यायालयाने परवानगी दिल्यामूळे वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या असून ऐन मकर संक्रातीच्या दिवशीच वाल्मिक कराडवर संक्रात बसली आहे.
केज तालुक्यातील मस्साजोग येथील 15 एकरहून अधिक जमिनीवर स्थापन करण्यात आलेल्या आवादा ऍनर्जी कंपनीच्या अधिकाऱ्यांना 2 कोटीची खंडणी मागून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी वाल्मीक कराड, विष्णू चाटे व सुदर्शन घुले या तिघांविरुद्ध प्रकल्प अधिकारी सुनील केदु शिंदे यांच्या फिर्यादीवरून 11 डिसेंबर रोजी खंडणीचा गुन्हा नोंद झाला होता. यातील आरोपी विष्णू चाटेला 18 डिसेंबर रोजी बीडजवळ लक्ष्मी चौकात अटक केली होती. तर वाल्मिक कराडचे 100 बँक खाते गोठविल्यानंतर त्याची नाकेबंदी झाल्यामुळे तो पुण्यातील पाषाण परिसरातील सीआयडीच्या कार्यालयात 31 डिसेंबर रोजी सकाळी शरण आला होता. त्याच दिवशी रात्री साडे आकरा वाजता त्याला केज न्यायालयात हजर केले असता केज न्यायालयच्या मुख्य न्यायाधीश एस. व्ही. पावसकर यांनी त्याला 14 जानेवारीपर्यंत एकूण 15 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती.
दरम्यान, मंगळवारी त्याच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे त्याला दुपारी केज न्यायालयात हजर केले असता या प्रकरणी शासनाने नियुक्त केलेले माजलगाव येथील सरकारी वकील अॅड. जितेंद्र शिंदे यांनी त्याला आणखीन 10 दिवसाच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. त्याला आक्षेप नोंदवित आरोपीचे वकील अॅड. सिद्धेश्वर ठोंबरे यांनी कराड स्वतः होऊन पोलिसांना शरण आला आहे. 15 दिवसाची पोलीस कोठडी त्याला देण्यात आली होती. आता त्याला पोलीस कोठडीची गरज नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून न्यायाधीश निशांत गोळे यांनी वाल्मिक कराडला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली. वाल्मिक कराड याला मंगळवारी 12: 32 वाजता केज न्यायालयात हजर केले होते. 4:17 वाजता त्याला बीड येथील कारागृहकडे पोलीस घेऊन गेले.
जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखलवाल्मिक कराड याला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावताच त्याला जामीन मिळावी यासाठी लागलीच न्यायालयात अर्ज दाखल केला असल्याची माहिती आरोपीचे वकील ऍड सिद्धेश्वर ठोंबरे यांनी लोकमतशी बोलताना दिली. यासंबधीचा निर्णय चार दिवसात अपेक्षित असल्याचेही त्यांनी सांगितले.
सरकारी पक्षाचा युक्तीवादसरकारी पक्षाच्या वतीने माजलगावचे सरकारी वकील ऍड जितेंद्र शिंदे यांनी अतिशय प्रभावी पणे बाजू मांडून 10 दिवसाच्या वाढीव पोलीस कोठडीची मागणी केली.यावेळी 13 मुद्दे मांडून वाल्मिक कराड याने त्याची संपत्ती कोणा, कोणाच्या नावावर केली आहे. हे तपासण्यासाठी व त्याने परदेशात काही गुंतवणूक केली आहे का?वाल्मीक कराडचा सरपंच संतोष देशमुख हत्ये प्रकरणात सहभाग आहे का? या साठी सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड या दोघांचीही एकत्र चौकशी करायची असल्यामुळे वाल्मिक कराड याला 10 दिवसाची वाढीव पोलीस कोठडी देण्यात यावी असा युक्तीवाद ऍड जितेंद्र शिंदे यांनी न्यायालयात केला.
आरोपी पक्षाचा युक्तिवाद- आरोपी वाल्मिक कराड याच्या वतीने युक्तिवाद करताना ऍड सिद्धेश्वर ठोंबरे यांनी सरकारी वकिलांनी मांडलेले सर्व मुद्दे खोडले.- वाल्मिक कराडला पोलिसांनी अटक केली नाही. तो स्वता शरण आला.पोलीस कोठडीत त्याने तपासकामी सहकार्य केले आहे.आरोपी वाल्मिक कराड याच्या वतीने सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड यांची न्यायालयीन कोठडीत आसताना एकत्रितपणे चौकशी करता येऊ शकते.-29 नोव्हेंबर रोजी धमकी दिल्याचा वाल्मिक कराड विरुद्ध गुन्हा नोंद नाही - वाल्मिक कराडचे सर्व बँक खाते गोठविण्यात आले आहेत.- सरपंच हत्येच्या गुन्ह्यात आरोपी नाही.- 15 दिवसापेक्षा जास्त पोलीस कोठडी देता येत नाही,कर्नाटक उच्च न्यायालयच्या निर्णयाचा पुरावा सादर. याप्रमाणे ऍड सिद्धेश्वर ठोंबरे यांनी प्रभावी पणे युक्तीवाद केला. तो न्यायालयाने मान्य करून 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी दिली.
सरपंच हत्ये प्रकरणी उद्या न्यायालयात हजर करणार खंडणी प्रकरणी वाल्मिक कराड याला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी मिळाली असली तरी. त्याला मकोका लागू केल्या मूळे सरपंच हत्येत त्याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.त्यामुळे एस आय टी अधिकाऱ्यांनी मंगळवारीच केज येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश कुणाल जाधव यांचेकडे सरपंच हत्ये प्रकरणी ताब्यात घेण्याची परवानगी मागितली. ती न्यायालयाने मान्य केल्यामुळे वाल्मिक कराड याला सरपंच संतोष देशमुख हत्ये प्रकरणी अटक करून बुधवारी केज न्यायालयात हजर केले जाणार आहे.