गेवराई ( बीड ) : भाजप नगरसेवकाने वाळूची अवैध वाहतूक करणारा हायवा ट्रक पोलीस आणि महसूल पथकाच्या ताब्यातून धुडगूस घालत पळवल्याची घटना तालुक्यातील रांजणी जवळ मंगळवारी सकाळी घडली. याप्रकरणी बुधवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार आहे. आरोपींमध्ये भाजप नगरसेवक राहुल खंडागळे याच्यासह तिघांचा समावेश आहे.
मंगळवारी सकाळी वाळुची वाहतूक करणारा हायवा ट्रक हा राष्ट्रीय महामार्गावरून जात असल्याची माहिती तहसिलदार सचिन खाडे यांना मिळाली. तहसीलदार खाडे लागलीच तलाठी परम काळे यांना घेऊन गढीच्या दिशेने रवाना झाले. तहसीलदार यांनी हायवा ट्रकचा पाठलाग करत रांजणी येथे रोखला. यातील वाळू विना रॉयल्टी विक्रीसाठी जात असल्याचे चालकाच्या चौकशीतून स्पष्ट झाले. तहसीलदारांनी लागलीच पोलिसांना याची माहिती देऊन ट्रक जप्त करण्यास सांगितले.
दरम्यान, चालकाने फोनवरून ट्रक जप्त करण्यात आल्याची माहिती एकास दिली. यानंतर तेथे एका जीपमधून भाजप नगरसेवक राहुल खंडागळे आणि इतर दोघे आले. तिघांनी तहसीलदार खाडे आणि तलाठी काळे यांच्यासोबत ट्रक पकडण्यावरून हुज्जत घातली. तसेच पोलीस ट्रक घेऊन जात असताना त्यांना धमकावले. ऐवढ्यावरच न थांबता खंडागळे आणि त्याच्या साथीदाराने महसूल आणि पोलिसांच्या ताब्यातील ट्रक तेथून पळवला. याप्रकरणी भाजपाचे नगरसेवक राहुल खंडागळे याच्यासह तीन जणांवर बुधवारी रात्री तलाठी परम काळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपी फरार असून पोलीस पुढील तपास करत आहेत.