धारूर: मोबाईलवर पाठविलेला ओटीपी नंबर विचारून काही वेळात सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या खात्यावरील १ लाख ८० हजार रुपये परस्पर गायब केल्याचा प्रकार मंगळवारी घडला. संबंधित ग्राहकाने तात्काळ बँकेत जाऊन हा प्रकार सांगताच संबंधित खात्याचे व्यवहार थांबवून या खात्यावरील पुढील रक्कम वाचवण्यात यश आले. अशा वाढत्या प्रकारामुळे बँक ग्राहकात मात्र भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित ग्राहकाने सायबर पोलीस विभागात तक्रार दिली आहे.
धारूर येथील एसबीआयच्या पेठ विभाग शाखेत महावितरणचे सेवानिवृत्त कर्मचारी कमलाकर हेडगीरे यांचे खाते होते. सेवा निवृत्तीनंतर, आलेली सर्व रक्कम त्यांनी खात्यावरच ठेवली होती. सायबर गुन्हेगारांना याचा गैरफायदा घेत २ मार्च रोजी दुपारी चार ते साडेचारच्या दरम्यान हेडगिरे यांना फोन आला. बँकेतून बोलतोय असे सांगत त्यांच्या मोबाईलवर आलेला ओटीपी नंबर विचारला. बँकेतून फोन म्हटल्याने ग्राहकाने त्याला आलेला ओटीपी सांगितला. असा प्रकार पाच वेळा घडल्याने ग्राहकाला संशय आला. सरळ त्याने बँक गाठली. ओटीपी नंबरवरून पाच वेळा मिळून १ लाख ८० हजार रुपये काढण्यात आल्याचे लक्षात आले. बँकेने तात्काळ या खात्याचे व्यवहार थांबवले त्यामुळे पुढील रक्कम मात्र वाचली. हेडगिरे यांनी बीड पोलीस अधिक्षक कार्यालयात सायबर क्राईम विभागात तक्रार दिली असून धारूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.