अंबाजोगाई : शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट बनली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र काही केल्या थांबत नाही. आर्थिक पॅकेजेस, कर्जमाफी आदी सरकारकडून केल्या जाणाऱ्या मदतीनेही परिस्थितीत बदल झालेला नाही. यासाठी शेतकरीविरोधी कायदे रद्द करण्यात यावेत, अशी मागणी आमदार नमिता मुंदडा यांनी मुख्यमंत्र्यांकडे एका निवेदनाव्दारे केली आहे.
शेतकऱ्यांच्या जमिनीचे तुकडे पडत आहेत. जमीनधारणा इतकी लहान झाली आहे की, त्यावर कुटुंबाची उपजीविका भागविणेदेखील कठीण झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्याची आणि शेती व शेतकऱ्यांशी संबंधित जाचक कायदे रद्द करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. शेतकऱ्यांसाठी शेतकरीविरोधी कायदे गळफास बनले आहेत. यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या दृष्टीने विचार करून तातडीने पावले उचलायला हवीत.
भूसंपादन कायदा हा नेहमीच शेतकऱ्यांना धोकादायक ठरत आला आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी काढून त्या इतर व्यावसायिकांना देणे थांबविले पाहिजे. या परिस्थितीमुळे कृषी क्षेत्रातील गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळत नाही. म्हणून हे कायदे रद्द केल्यावरच कृषी विकासाचा मार्ग खुला होऊ शकतो. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्यात यासाठी कृषी क्षेत्राची पुनर्बांधणी होणे आवश्यक झाले आहे, अशी मागणीही मुंदडा यांनी केली आहे.