कडा/गेवराई (बीड) : जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये पूरस्थितीमुळे गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. आष्टी तालुक्यातील देवीनिमगाव येथील पूल धोकादायक बनला असून, गेवराई तालुक्यातील अर्धामसला गावाचा संपर्क तुटला आहे. या दोन्ही घटनांमुळे प्रवाशांची आणि शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे.
देवीनिमगावातील पूल खिळखिळा; जड वाहतूक बंदआष्टी तालुक्यातील देवीनिमगाव येथील नदीवर असलेला पूल धोकादायक बनल्याने तो जड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. या पुलाची उंची कमी असल्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात तो पाण्याखाली जातो. गेल्या आठ दिवसांत दोनदा महापूर आल्याने पुलाचे संरक्षण कठडे आणि रस्ता उखडला आहे. आता हा पूल ठिकठिकाणी तुटल्यामुळे मोठी वाहने बंद करण्यात आली आहेत. हा पूल पूर्णपणे खिळखिळा झाला असून, यामुळे मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचे स्थानिकांनी सांगितले. पैठण-बारामती महामार्गावर हा पूल असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक असते. सामाजिक कार्यकर्ते रमेश गावडे यांनी या पुलाची उंची वाढवण्याची मागणी केली आहे.
अर्धामसला गावाचा संपर्क तुटलादरम्यान, गेवराई तालुक्यातही पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. यामुळे अर्धामसला गावाजवळून वाहणाऱ्या खराडी नदीला पूर आल्याने गावाचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. गावातील नागरिक राजू खळगे आणि अशोक नरवडे यांनी सांगितले की, गावात जाण्यायेण्याचा एकमेव मार्ग गेल्या चार तासांपासून बंद आहे. नदी, नाले आणि ओढ्यांना आलेल्या पुरामुळे शेतातील पिकेही पूर्णपणे वाहून गेली आहेत. सर्व पिके पाण्याखाली गेल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. या दोन्ही घटनांनी प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे केले असून, यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिक करत आहेत.