बीड जिल्हाधिकारीपदी राहुल रेखावार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2020 12:10 AM2020-02-05T00:10:00+5:302020-02-05T00:12:15+5:30

तब्बल दोन महिन्यानंतर मंगळवारी बीड जिल्हाधिकारी म्हणून राहुल रेखावार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Rahul Rekhawar as Beed Collector | बीड जिल्हाधिकारीपदी राहुल रेखावार

बीड जिल्हाधिकारीपदी राहुल रेखावार

googlenewsNext
ठळक मुद्देदोन महिन्यानंतर निघाले आदेश : कामांना मिळणार गती

बीड : तत्कालिन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांची बदली होऊन तब्बल दोन महिने झाले आहेत. त्यांच्या जागेवर प्रेरणा देशभ्रतार याची नियुक्ती करण्यात आली होती मात्र, त्या रुजू न झाल्यामुळे जिल्हाधिकारी पद रिक्तच होते. प्रभारी जिल्हाधिकारी म्हणून जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांच्याकडे पदभार होता. परंतु, तब्बल दोन महिन्यानंतर मंगळवारी बीड जिल्हाधिकारी म्हणून राहुल रेखावार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राहुल रेखावार यांच्या नियुक्तीचे पत्र राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी काढले आहे. यामध्ये बीड येथील पदभार प्रेरणा देशभ्रतार यांनी न स्वीकारल्यामुळे त्याजागी त्वरित रुजू होण्याचे आदेश रेखावार यांना दिले आहेत. बुधवारी रुजू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राहुल रेखावार हे राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये अध्यक्ष व सहव्यवस्थापकीय संचालक पदाची धुरा सांभाळत होते. बीड येथील जिल्हाधिकारीपदी मूळ पदावरील जिल्हाधिकारी नसल्यामुळे अनेक कामे देखील खोळंबली होती. त्यामुळे नवीन जिल्हाधिकारी आल्यामुळे खोळंबलेल्या कामांना गती मिळणार आहे. तसेच अजित कुंभार यांना पूर्ण वेळ जिल्हा परिषदेत काम करता येईल. त्यामुळे त्या ठिकाणी ठप्प झालेल्या कामांना देखील गती मिळेल अशी अपेक्षा नागरिकांना आहे. नवीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्यापुढे जिल्ह्यातील मुलभुत विकासासोबतच इतर विविध आव्हाने असणार आहेत.
रेखावार यांनी सुरवातीला राजापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी, सिंधुदुर्गचे सहाय्यक जिल्हाधिकारी, हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, परभणी महानगर पालिकेत आयुक्त, धुळे येथे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले आहे. रेखावार हे मूळचे खडकी बाजार, (ता. हिमायतनगर, जि. नांदेड) येथील रहिवासी आहेत. त्यांचे पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण नांदेड येथील पीपल्स हायस्कूलमध्ये झाले. बारावीच्या परीक्षेत ते बोर्डात दुसऱ्या क्र मांकाने उत्तीर्ण झाले. त्यांनी राजस्थानमधील पिलानी येथे इलेक्ट्रीकल आणि इलेक्ट्रॉनिक्स याविषयात अभियांत्रिकी शाखेचे शिक्षण घेतले.
महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर रेखावार यांनी भाभा अणुशक्ती केंद्रात काम केले आहे. तसेच इंडियन इन्स्टीट्यूट आॅफ सायन्समध्येही त्यांनी कामाचा अनुभव घेतला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे २०११ मध्ये घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षेत ते देशात १५ व्या क्र मांकाने उत्तीर्ण झाले.

Web Title: Rahul Rekhawar as Beed Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.