पाटोदा (जि. बीड) : पंचायत समितीचे कर्मचारी पैसे घेतल्याशिवाय काम करत नाहीत. त्यामुळे त्यांना पन्नास लाखांच्या खोट्या नोटा देऊन आंदोलन करण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, पाटोदा पंचायत समितीमध्ये गाय गोठा, विहिरी मंजुरी करण्यासाठी सामान्य जनतेला पैसे द्यावे लागतात. पैसे दिल्याशिवाय कामे होत नाहीत, मस्टरसाठी पैसे, घरकुल मंजुरीसाठी पैसे द्यावे लागतात तसेच चुंबळी ग्रामपंचायतमध्ये सरपंच, ग्रामसेवक मनमानी कारभार करत लोकांची अडवणूक करतात. त्यांच्यावर कारवाई करावी तसेच कर्मचाऱ्यांना काम करण्यासाठी पैसे लागतात त्यासाठी पाटोदा पंचायत समिती येथे २७ मार्च रोजी सकाळी ११ वाजता सामाजिक कार्यकर्ते गोरख झेंड यांच्या नेतृत्वाखाली ५० लाख रुपयांचे खोट्या नोटांचे बंडल पाटोदा पंचायत समिती गटविकास अधिकारी वानखेडे यांच्या दालनात देण्यात आले. तसेच जे कर्मचारी अडवणूक करतात त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते गोरख झेंड, भरत नागरगोजे, सतीश पवळ, सतीश उबाळे, सुनील जावळे, आदी उपस्थित होते.