बीड : पाटोदा तालुक्यातील मूगगाव शिवारात कावळ्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने पावले उचलली आहेत. पाटोदा तालुक्यातील आठ व आष्टी तालुक्यातील दोन अशा दहा गावांमध्ये कुक्कुट पक्ष्यांची खरेदी- विक्री, वाहतूक, बाजार व जत्रा, प्रदर्शन आयोजित करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे.
मूगगाव हे केंद्र निश्चित करून शिवारापासून १० किलोमीटर त्रिज्येतील परिसरात असलेल्या अंतापूर, वाहली, चिखली, निवडुंगा, सुप्पासावरगाव, भुरेवाडी जोगदंड, वसंतवाडी (ता. पाटोदा), तसेच आष्टी तालुक्यातील ब्रह्मगाव, पांगुळगव्हाण या गावांसाठी हे प्रतिबंधक आदेश आहेत.
कशासाठी प्रतिबंध?
या रोगाचा प्रसार जिल्ह्यात इतर ठिकाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून कुक्कुट पक्ष्यांची खरेदी- विक्री, वाहतूक, बाजार व जत्रा, प्रदर्शनावर प्रतिबंध घातला आहे.
मृत पक्षी आढळल्यास हात लावू नका
जिल्ह्यातील कोणत्याही गावांमध्ये कावळे, पोपट, बगळे किंवा स्थलंतरित पक्षी मृत झाल्याचे किंवा व्यावसायिक पोल्ट्री फार्ममधील पक्ष्यांमध्ये नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात मृत्यू झाल्याचेस निदर्शनास आल्यास तत्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यास माहिती द्यावी, मृत पक्ष्यांना हात लावू नये, शवविच्छेदन करू नये किंवा परस्पर विल्हेवाट लावू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांसह संस्थांनी सजग राहावे
प्राण्यांमधील संक्रामक व संसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियमानुसार पशुपालक अथवा कोणत्याही व्यक्ती, शासनेत्तर संस्था, सार्वजनिक संस्था किंवा ग्रामपंचायतीला अशा रोगाचा संसर्ग झाल्याची शक्यता वाटल्यास त्याबाबत नजीकच्या ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत प्रभारी यांना देऊन ही माहिती पशुवैद्यकीय दवाखान्यास लेखी स्वरूपात कळवावी, असे प्रशासनाने कळवले आहे.