धारूर : वेगात येणाऱ्या कारने एका जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात, दुचाकीवरील पुजारी ठार झाल्याची घटना तेलगाव येथील शिवाजी चौकात मंगळवारी रात्री घडली.
धारूर तालुक्यातील भोपा येथील मारुती श्रीकिसन साबळे हे तेलगाव येथील शिवाजी चौकातील श्री हनुमान मंदिरात पुजारी म्हणून काम करतात. सध्या लाॅकडाऊन असल्याने मंदिर बंद आहे. त्यामुळे मंगळवारी सायंकाळी मारुती साबळे मंदिरात दिवाबत्ती करण्यासाठी आले होते. यावेळी माजलगाव रोडने भरधाव वेगाने येणाऱ्या एका कारने साबळे यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात साबळे गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ माजलगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले, परंतु त्यांना जास्त मार लागल्याने, त्यांना पुढील उपचारासाठी अंबेजोगाई येथील रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, तेथे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर भोपा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मारुती साबळे यांच्यापश्चात पत्नी, तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.
अपघाताचे वाढले
तेलगाव येथील शिवाजी चौकात पोलिसांच्या दुर्लक्षामुळे चारही रस्त्यांवर ऐन चौकालगतच अस्ताव्यस्तपणे वाहने लावली जातात. त्यातच अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीप तर भर रस्त्यात उभ्या करून प्रवासी भरतात. वाहनांच्या अशा प्रकारे होणाऱ्या गर्दीमुळे अनेक वेळा लहान मोठे अपघात झाले. त्यातच मंगळवारी रात्री हा अपघात होऊन, यात एका व्यक्तीचा नाहक बळी गेला. येथील चौकालगत उभी राहणारी वाहने थांबणार नाहीत, यासाठी दिंद्रुड पोलिसांनी उपाय करण्याची मागणी आहे.