बीड : जिल्ह्यातील आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोना लस देण्याबाबत नियोजन सुरू झाले आहे. एका केंद्रावर दररोज १०० कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. याबाबत दोन दिवस राज्यस्तरावरून प्रशिक्षण देण्यात आले आहे. लस देण्यासाठी जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही आठवडाभरात प्रशिक्षण दिले जाणार आहे. लस कधी येणार, याबाबत मात्र, अद्याप तारीख निश्चीत झाली नाही.
कोरोनाने सर्वत्र हाहाकार केला आहे. या लढ्यात सर्वात पुढे होऊन आरोग्य विभागाने काम केले. त्यामुळे कोरोना लस देण्यासाठी त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात आले आहे. यासाठी महिनाभरापूर्वीच खाजगी व सरकारी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची यादी मागविण्यात आली होती. त्याप्रमाणे जिल्ह्यात तब्बल १५ हजार लोक असल्याचे समोर आले आहे. या सर्वांना लस देण्याच्या हालचाली मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. याच अनुषंगाने सोमवार व मंगळवारी राज्यस्तरावरून सहसंचालक डॉ.डी.एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली युनिसेफ, युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम, जागतिक आरोग्य संघटना यांनी प्रशिक्षण दिले आहे. यात सर्व वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख यांची उपस्थिती होती.
कोरोना लस देण्याबाबत प्राथमिक माहिती देणारे प्रशिक्षण मिळाले आहे. आता जिल्हा, तालुकास्तरावर देणार आहोत. कोणती लस आणि कशी द्यायची, याचे मार्गदर्शन मिळालेले नाही. जिल्ह्यात जवळपास १५ हजार अधिकारी, कर्मचारी आहेत. - डॉ.संजय कदम, नोडल ऑफिसर, कोरोना लसीकरण
बीडमध्ये असे असेल नियोजन- ग्रामीण, उपजिल्हा व जिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणी ही लस देण्यासाठी बुथ तयार केले जातील.- प्रतिक्षा खोली, नोंदणी व नंतर लस देण्यासाठी नियोजन असेल. यासाठी पोलीस, शिक्षकांची मदत घेतली जाणार आहे.- तसेच राज्यस्तरावरील प्रशिक्षण पूर्ण झाले असून आता जिल्हा स्तरावरून नोडल ऑफिसर डॉ.संजय कदम हे प्रशिक्षण देणार आहेत. - नंतर तालुकास्तरावर प्रशिखण पूर्ण करण्यात येणार आहे. आठवडाभरात ते पूर्ण होऊन बुथबाबत नियोजन केले जाईल. - लस कोणती आणि कशी दिली जाणार, याबाबत जिल्हास्तरावर कसल्याच सुचना आलेल्या नाहीत.