कुंडलिक खांडेच्या पदाला स्थगितीनंतर आता शिवसेनेचे दुसरे जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधवही अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2021 04:54 PM2021-11-24T16:54:38+5:302021-11-24T16:57:02+5:30

Beed Shiv Sena : शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी शिवसेनाप्रमुखांची कशी दिशाभूल केली, याचा व्हिडिओ व तक्रार शिवसेनेचे शहरप्रमुख पापा सोळंके यांनी पक्षाकडे पाठवला आहे.

Postponement of Kundlik Khande's Shiv Sena's district chief post, now another district chief Appasaheb Jadhav is also in trouble | कुंडलिक खांडेच्या पदाला स्थगितीनंतर आता शिवसेनेचे दुसरे जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधवही अडचणीत

कुंडलिक खांडेच्या पदाला स्थगितीनंतर आता शिवसेनेचे दुसरे जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधवही अडचणीत

googlenewsNext

- पुरुषोत्तम करवा
माजलगाव : सध्याचे जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी तीन वर्षांपूर्वी असंख्य पदाधिकाऱ्यांसह शिवसेनेत ( Shiv Sena ) प्रवेश केल्याचे सांगून पक्षप्रमुखांकडून पाठ थोपटून घेतली. वास्तविक पाहता ज्यांचे प्रवेश झाले त्यातील काही आगोदरच शिवसैनिक आहेत, तर काहींकडे एकही पद नसताना त्यांना नगरसेवक, पंचायत समिती सदस्य आणि बाजार समितीचे सभापती दाखविले आहे. याचा एक व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल झाला आहे. जिल्हाप्रमुखानेच पक्षप्रमुखांची दिशाभूल केल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात आहे. कुंडलिक खांडे यांच्या पदाला स्थगिती मिळताच आता दुसरे जाधवही व्हिडीओमुळे अडचणीत सापडले आहेत.

आप्पासाहेब जाधव हे आगादेर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. तीन वर्षांपूर्वी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवबंधन बांधले. यावेळी त्यांच्यासोबत तिघांनी पक्षात प्रवेश केला. यात रमेश शिंदे हे पंचायत समिती सदस्य दाखविले; तर , भागवत शिंदे यांना माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दाखवून पक्षात प्रवेश केला. वास्तविक पाहता, हे दोन्ही लोक कोणत्याही संस्थेचे पदाधिकारी नाहीत. त्याचबरोबर २० वर्षांपासून शिवसेनेत असलेले दासू बादाडे हे शिवसेनेत केवळ तालुका संघटक, उपजिल्हाप्रमुख अशी पदे भूषविली होती. ते केव्हाही नगरपालिकेला उभा राहिलेले नाहीत. तरीपण जाधव यांनी बादाडे यांना राष्ट्रवादीचे नगरसेवक असे संबोधून पक्षात प्रवेश केला. हे सर्व लोक शिवसेनेत आणल्याने जुन्या शिवसैनिकांना डावलून पक्षाने त्यांना आगोदर तालुकाप्रमुख केले. त्यानंतर सचिन मुळूक यांना बाजूला करत जिल्हाप्रमुखाची माळ जाधव यांच्या गळ्यात टाकली. माळ गळ्यात पडून शहरात प्रवेश होताच माजलगावचे शहरप्रमुख पापा सोळंके यांना जाधव यांच्या भावाने रस्त्यात आडवे पाडून मारहाण केली होती. त्यानंतर अंतर्गत वाद आजही सुरूच असल्याचे सांगण्यात येत आहे.

व्हिडीओने चर्चेला उधाण
सामान्यांना पदाधिकारी दाखवून शिवसेनेत प्रवेश केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यातून त्यांनी पक्षप्रमुखांची दिशाभूल केल्याचे स्पष्ट दिसत आहे. या व्हिडीओत माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांचीही उपस्थिती दिसत आहे. दोन दिवसांपूर्वीच कुंडलिक खांडे यांच्या जिल्हाप्रमुख पदाला स्थगिती मिळाल्याने आगोदरच शिवसेना चर्चेत आली होती. आता या व्हिडीओची आणखी भर पडल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

जाधव म्हणाले, मी कार्यक्रमात
या सर्व परिस्थितीबद्दल जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांना फोनवरून संपर्क केला. त्यांना प्रश्न विचारताच त्यांनी आपण कार्यक्रमात आहोत, असे सांगून बोलणे टाळले. त्यानंतर रात्री आठ वाजेपर्यंत त्यांचा प्रतिसाद मिळाला नाही.

मी शिवसैनिकच - बादाडे
राष्ट्रवादीचे नगरसेवक म्हणून शिवसेनेत प्रवेश दाखविलेले दासू बादाडे यांनाही संपर्क केला. यावर ते म्हणाले, मी २० वर्षांपासून शिवसैनिकच आहे. जाधव यांचा प्रवेश होण्यापूर्वी मला राष्ट्रवादीचा नगरसेवक दाखवून माझा प्रवेश घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

पक्षाकडे तक्रार
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी शिवसेनाप्रमुखांची कशी दिशाभूल केली, याचा व्हिडिओ व तक्रार शिवसेनेचे शहरप्रमुख पापा सोळंके यांनी पक्षाकडे पाठवला आहे.

Web Title: Postponement of Kundlik Khande's Shiv Sena's district chief post, now another district chief Appasaheb Jadhav is also in trouble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.