लोकमत न्यूज नेटवर्क
बीड: खंडणीच्या गुन्ह्यात अटक असलेला आरोपी वाल्मीक कराड याच्यासोबत एसआयटीतील स्थानिक गुन्हे शाखेतील एका अधिकाऱ्याचा फाेटो व्हायरल झाला. खासदारांसह आमदारांनी यावर आक्षेप नोंदविला. त्यामुळे एका अधिकाऱ्यासह दोन कर्मचाऱ्यांना थांबविण्यात आले असून केवळ एकच अधिकारी यात सोडल्याचे सूत्रांनी सांगितले.
मस्साजोग सरंपच हत्या, खंडणी व मारहाण प्रकरणाचा तपास सध्या सीआयडी करत आहे. सर्व प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उपमहानिरीक्षक बसवराज तेली यांच्या नेतृत्वात एसआयटी नियुक्त केली. यात स्थानिक गुन्हे शाखेतील सहायक पोलिस निरीक्षक विजयसिंह झोनवाल, पोलिस उपनिरीक्षक महेश विघ्ने, सहायक फौजदार तुळशीराम जगताप, हवालदार मनोज वाघ यांचाही समावेश होता. विघ्नेसह काही कर्मचाऱ्यांचे कराडसोबत फोटो व्हायरल झाले.
असे पोलिस वाल्मीकला शिक्षा देतील का?
एसआयटीत अध्यक्ष असलेले पोलिस अधिकारी वगळता इतर सर्व अधिकारी हे वाल्मीकचे पोलिस आहेत, असा दावा शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी ‘एक्स’ समाजमाध्यमाद्वारे केला आहे. एसआयटीतील एक पोलिस उपनिरीक्षक महेश विघ्ने यांचा वाल्मीक कराडबरोबरचा एक फोटोही आव्हाड यांनी समाजमाध्यावर टाकला आहे. ‘धनंजय मुंडे निवडून आल्यावरचा हा फोटो असल्याचा दावा आ. आव्हाड यांनी केला आहे.