- संजय खाकरेपरळी ( बीड): ''लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी दिलेल्या मंत्रास आपण मुठमाती देणार नाही. उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही, हा मुंडे साहेबांचा मंत्र आपण कायमस्वरूपी अंमलात आणणार आहे. पक्षाचे कार्य वाढवून वंचितांना न्याय देण्याचे काम करण्यास कटिबद्ध आहोत'', असे वचन भाजपा नेत्या व विधान परिषद आमदार पंकजा मुंडे यांनी पांगरी ( ता. परळी ) येथे आज दिले. 'मी गोपीनाथराव मुंडे यांचे नाव जगाला विसरून देणार नाही, असे काम आपण करणार',अशी ग्वाही त्यांनी दिली.
परळी तालुक्यातील पांगरी येथील गोपीनाथ गडावर 12 डिसेंबर रोजी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांची जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली. यावेळी भजन झाले. गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीस्थळावर पुष्प अर्पण करून आ.पंकजा मुंडे, माजी खासदार प्रीतम मुंडे, आ. धनंजय मुंडे, रासपचे अध्यक्ष महादेव जानकर, ओबीसी नेते लक्ष्मण हाके, आ. नमिता मुंदडा, आ. मोनिका राजळे,आ. मनोज कायंदे, माजी आमदार आर. टी. देशमुख, भीमराव धोंडे, डॉ. कायंदे, सतीश नागरे, बीड जिल्हा परिषदेचे माजी गट नेते अजय मुंडे, हभप रामेश्वर महाराज कोकाटे यांच्यासह राज्यातून आलेल्या भाजपा पदाधिकारी व मुंडे यांच्या चाहत्यांनी गुरुवारी सकाळी दर्शन घेतले.
भजनाच्या कार्यक्रमानंतर पंकजा मुंडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाले की. तीन दिवसापूर्वी बीड जिल्हा तील केज तालुक्यातील मस्साजोगच्या सरपंचाची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणातील दोषींना कडक शिक्षा झाली पाहिजे, यासाठी आपण आग्रही आहोत. सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहोत. आपण त्यांच्या पाठीशी आहोत, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्र्याकडे पाठपुरावा करीत आहोत, एखाद्याचा जीव घ्यावा हे चुकीचे आहे. बीड जिल्ह्यात असे वर्तन चालणार नाही.
राजकारणात मन मोठे ठेवले पाहिजे. राजासारखे मन असले पाहिजे. गोपीनाथराव मुंडे यांनी आपल्यावर व कार्यकर्त्यावर चांगले संस्कार केले आहे. आमच्या भाजप कार्यकर्त्याकडून कोणालाही नख लागणार नाही याची दक्षता आपण घेतली आहे. आपण पालकमंत्री असताना माणुसकीला प्राधान्य दिले, माणुसकीचे नाते जपले आहे. असेही पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.
गोपीनाथराव मुंडे यांनी गृहमंत्री असताना मुंबईतील गुन्हेगारी मोडीत काढली. व गुन्हेगारांना शिक्षा दिली. अंडरवर्ल्ड विरुद्ध मोहीम उघडली होती असेही पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणात केला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आपण मराठवाड्याचे मागासले पण दूर करण्याची मागणी केली आहे. मराठवाड्यातील सिंचनाचा प्रश्न ,बेरोजगारीचा प्रश्न शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण मुख्यमंत्र्याकडे पाठपुरावा केला आहे. महिलांनाही शासनाने चांगली संधी द्यायला हवी ,त्यांच्या हाताला काम मिळाले पाहिजे यासाठी आपले योगदान राहील, असे ही पंकजा मुंडे म्हणाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास मिळत आहे ही भाग्याची बाब आहे. 2014, 2019 व 2024 मधील राज्याच्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने आपली तीन वेळा स्टार प्रचारक म्हणून नियुक्ती केली.आणि त्या त्या वेळी निवडणुकीत आपण राज्यभर पक्षाच्या सभा घेतल्या हे देखील त्यांनी अधोरेखित केले.