परळी : येथील उद्योजक अमोल डूबे यांचे 9 डिसेंबर रोजी रात्री औद्योगिक वसाहत परळी येथून बंदुकीचा धाक दाखवून अपहरण करून परळी- अंबाजोगाई रस्त्यावरील कन्हेरवाडी घाटात सोन्याच्या बिस्किटासह रोख रक्कम आठ लाख 28 हजार रुपयाची खंडणी घेतल्याप्रकरणी परळीच्या शहर पोलिसांनी एकूण पाच आरोपींना अटक केले आहे व खंडणीपोटी घेतलेले दहा तोळ्याचे सोन्याचे बिस्कीट व रोख रक्कम जप्त करण्यात आले आहे .तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या दोन कार व गावठी कट्टा ,एक जिवंत काडतुस ही पोलिसांच्या पथकाने जप्त केले आहे. असा एकूण 17 लाख 12 हजार रुपये किमतीचा एकूण ऐवज परळी पोलिसांनी ताब्यात घेण्यात यश मिळवले आहे. अशी माहिती बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ व संभाजीनगरचे पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.
परळी शहर पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीमध्ये परळीतील एकाचा तर अंबाजोगाई येथील परळी वेस भागात राहणाऱ्या चौघा जणांचा समावेश आहे. चैतन्य पंढरी उमाप वय 24 वर्ष ,सागर उर्फ बबलू सूर्यवंशी वय 22 वर्ष शंकर भगवान जोगदंड वय 22 वर्ष, सचिन श्रीराम जोगदंड वय २५ वर्ष सर्व राहणार परळीवेस अंबाजोगाई व जय उर्फ सोनू संजय कसबे वय 26 वर्ष राहणार सिद्धार्थ नगर परळी ही अटक आरोपींची नावे आहेत. या गुन्हाचा मास्टर माईंड परळीच्या सिद्धार्थ नगर भागातील जय उर्फ सोनू संजय कसबे हा असून त्याला पुणे येथे जाऊन पोलिसांनी अटक केली आहे. तर गावठी कट्टा व एक जिवंत काडतुस सचिन श्रीराम जोगदंड यांच्या ताब्यातून जप्त करण्यात आली आहे. असे पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे यांनी सांगितले. गुन्हा दाखल झाल्यानंतर तीन दिवसाच्या आत पहिला आरोपी अटक केला त्यानंतर इतर चार आरोपी अटक करण्यात आले. सर्व आरोपीना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
परळी शहर चे पोलीस निरीक्षक रघुनाथ नाचन संभाजीनगरचे पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश शिंदे ,नितीन गट्टूवार, पोलीस जमादार नरहरी नागरगोजे ,बालाजी दराडे ,भास्कर केंद्रे गोविंद येलमटे ,अंकुश मेंडके ,गोविंद भताने ,पंडित पांचाळ आयटीसेल चे बिकी सुरवसे यांच्या पथकाने कारवाई केली.
काय आहे प्रकरण ?पाच अनोळखी व्यक्तीने तोंडाला रुमाल बांधून जीवे मारण्याच्या धमक्या देऊन 9 डिसेंबर रोजी रात्री 9 वाजता उद्योजक अमोल विकासराव डूबे यांचे त्यांच्या ऑफिस जवळून मोटर सायकल अडवून जबरदस्तीने कार मध्ये बसवून आपहरण झाले. व परळी -अंबाजोगाई रस्त्यावरील कन्हेरवाडी घाटात नेऊन दोन कोटी दे नाहीतर तुला जिवंत मारू अशी धमकी दिली. या धमकीनंतर डूबे यांनी स्वतःजवळील रोख रक्कम, गळ्यातील सोन्याचे लॉकेट व आपल्या ड्रायव्हरच्या साह्याने मागून घेतलेले सोन्याचे बिस्किट व रोख रक्कम असे दिल्यानंतर आरोपींनी उद्योजक डूबे यांची कन्हेवाडी घाटातून रात्री साडेअकरा वाजता सुटका केली. आरोपी अंबाजोगाई कडे गेले. या थरार प्रकारानंतर अमोल डूबे हे परळीला आले दुसऱ्या दिवशी दहा डिसेंबर रोजी परळी शहर पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार नोंदवली त्यावरून पोलिसांनी पाच अनोळखी व्यक्तीविरुद्ध अपहरण व खंडणीचा गुन्हा दाखल केला.
सहा पैकी पाच आरोपी अटकेतहा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक चेतना तिडके, गेवराईचे उप विभागीय पोलीस अधिकारी राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिसांची दोन पथके , एलसीबी बीडचे पथक तसेच आयटीसेलचे पथक नेमण्यात आले. संभाजीनगरचे पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे यांनी याप्रकरणी आरोपींची शोध मोहीम सुरू करण्यासाठी पोलीस पथकांना मार्गदर्शन केले, घटनास्थळाचे सी सी टीव्ही फुटेज तपासण्यात आले व आयटीसीएल बीड यांच्या सहकार्याने घटनास्थळाचा मोबाईल टावर डाटा घेऊन व सीसीटीव्ही फुटेच्या मदतीने आरोपींच्या येण्या जाण्याचा मार्ग शोधून काढला व आरोपी निष्पन्न केले. एकूण सहा आरोपी पैकी पाच आरोपीना अटक करण्यात परळी पोलिसांना यश आले आहे तसेच मुद्देमाल ही सर्व जप्त करण्यात आला आहे.
तपासी टीमला बक्षीसपरळीतील अपहरण, खंडणीचा गुन्हा गांभीर्यपूर्वक होता. परंतु संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे यांच्या मार्गदर्शनाखाली परळी शहर, संभाजीनगर, आयटीसेल पोलीस कर्मचाऱ्यांनी कौशल्यपूर्वकपने हा गुन्हा उघडकीस आणून आरोपीकडून 17 लाख रुपयाचा ऐवज जप्त केला आहे. तपासी टीमला बक्षीस देण्यात आले आहे. - अविनाश बारगळ, जिल्हा पोलीस अधीक्षक, बीड