बीड : जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. १७ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंतच अर्ज स्वीकारले जाणार असल्याने, रविवारी (सुटीच्या दिवशीही) सर्वच पालिकांमध्ये उमेदवारांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. अनेकांनी अर्जही दाखल केले. तर आज शेवटच्या दिवशी दुपारी ३ वाजेपर्यंतच वेळ असल्याने सकाळपासूनच इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी केली आहे. अनेक उमेदवार शक्ती प्रदर्शनाच्या तयारीत असल्याचीही माहिती आहे.
सत्ताधारी महायुतीतील राष्ट्रवादी (अजित पवार गट) पक्षाने निवडणुकीच्या तोंडावर धावपळ सुरू केली आहे. पक्षाने केवळ धारूर आणि गेवराईत नगराध्यक्षपदाचे उमेदवार जाहीर केले आहेत, तसेच धारूरमध्ये नगरसेवक पदाचेही उमेदवार जाहीर झाले; पण बीडसह इतर प्रमुख शहरांमध्ये अजूनही उमेदवारीचा सस्पेन्स कायम आहे. त्यामुळे पक्षातील इच्छुकांमध्ये प्रचंड धावपळ सुरू आहे. भाजप आणि इतर प्रमुख पक्षांकडूनही अनेक जागांवर अजून अधिकृत घोषणा झालेली नसल्याने, कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे.
आज होणार शक्तिप्रदर्शनसोमवार हा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने, सर्वच ठिकाणी उमेदवारांची अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. अर्ज दाखल करण्यापूर्वी अनेक प्रमुख उमेदवार आपले शक्तिप्रदर्शन (रॅली) करण्याची तयारी करत आहेत. बीड शहरातही एका उमेदवाराने रॅलीसाठी प्रशासनाची परवानगी घेतल्याचे सांगण्यात आले.
समजूत काढताना दमछकाअंतिम दिवशी, अनेक नाराज नेते बंडखोरी करण्याची शक्यता असल्याने, राजकीय पक्षांचे नेते शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारांची समजूत काढण्यात आणि त्यांना अर्ज मागे घेण्यास सांगण्यात व्यस्त राहणार आहेत. दुपारी ३ नंतरच नेमके किती उमेदवार रिंगणात उतरतात, याचे चित्र स्पष्ट होणार आहे.
बीड पालिकेत सुविधाच नाहीतबीड पालिकेत आलेल्या लोकांसाठी पाणी आणि शौचालयाची सुविधाच नाही. हा प्रकार ‘लोकमत’ने निदर्शनास आणल्यानंतर रविवारी डॉ. गणेश ढवळे यांनी मोफत बाटली बंद पाणी वाटप करून पालिकेच्या ढिसाळ कारभाराचा निषेध व्यक्त केला. त्यानंतर पहिल्या मजल्यावरील बंद शौचालयाबाबत मुख्याधिकारी शैलेश फडसे यांना विचारण्यात आली. त्यांनी दुर्गंधी सुटत असल्याने बंद केल्याचे कारण दिले. स्वच्छतेची जबाबदारी असणारी पालिका अधिकारीच असे उत्तर देत असल्याने संताप व्यक्त करण्यात आला. दुसऱ्या मजल्यावर शौचालय सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. जर दुसऱ्या मजल्यावर जायचे तर मग पहिल्या मजल्यावर का बांधले? हा प्रश्न आहे.
Web Summary : Nomination filings for municipal elections in Beed are ending soon. Candidates are rushing to file, with power displays expected. Political parties scramble as deadlines loom, and basic amenities are lacking at Beed Municipality.
Web Summary : बीड में नगरपालिका चुनावों के लिए नामांकन दाखिल करने की समय सीमा करीब है। उम्मीदवार शक्ति प्रदर्शन के साथ नामांकन दाखिल करने की होड़ में हैं। राजनीतिक पार्टियाँ समय सीमा के नज़दीक आने से आपाधापी में हैं, और बीड नगरपालिका में बुनियादी सुविधाओं की कमी है।