लोकमत न्यूज नेटवर्क
माजलगाव : शहरातील सन्मित्र कॉलनी हा विद्यमान नगराध्यक्ष शेख मंजूर यांचा प्रभाग आहे. याच प्रभागात समस्या निर्माण झाल्याने या समस्या दूर कराव्यात, अशी मागणी नगराध्यक्षांकडे प्रभागवासीयांनी एका निवेदनाव्दारे ६ ऑगस्ट रोजी केली आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सन्मित्र कॉलनीमधील नाले खोल असून रस्ते अरुंद झाले आहेत. रोड व नालीमध्ये अंतर असलेल्या जागेमध्ये गवताबरोबर अनेक प्रकारची झाडे उगवली आहेत. एकाच बाजूने नाले तयार झाले असल्याने अनेकांच्या घरातील सांडपाणी रस्त्यावरून वाहते. परिणामी, परिसरात घाण व दुर्गंधी पसरत आहे. यातून डासांची उत्पत्ती होत असून प्रभागवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नाल्यांची स्वच्छता होत नाही. झाडलेला कचरा नाल्यांमध्येच टाकल्याने नाले तुंबले. त्यांची स्वच्छता करावी. दोन्ही बाजूने नाले करावे. या प्रभागात अनेक ठिकाणी पाणी जात नसताना नाले केले. पावसाळ्यात जागोजागी पाणी साचत असताना नाले केले जात नाहीत. तर ज्या ठिकाणी चांगले नाले असताना ते पाडून त्या ठिकाणी नवे नाले करण्यात आले असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. निवेदनावर डॉ. सचिन देशमुख, शिरीष देशमुख, ॲड. अनिल मोगरेकर, एस.आर. शर्मा, र.ब. देशमुख, रामराव जोशी, वर्षा कुलकर्णी, विष्णू आवळे, संतोष मुळी, सुहास देशमुख यांच्यासह प्रभागवासीयांच्या स्वाक्षऱ्या आहेत.