बीड : जिल्ह्यात आतापर्यंत सहा लोकांचा मृत्यू हा उष्माघाताने झाल्याच्या अफवा पसरल्या. या सर्व मयतांची माहिती घेऊन आरोग्य विभागाने चौकशी केली. सर्व वैज्ञानिक अहवाल प्राप्त केले. या चौकशी अंती केवळ एकाच महिलेचा मृत्यूउष्माघाताने झाल्याचे समोर आले आहे. इतर पाच मृत्यूची कारणे वेगवेगळी आहेत.
सुमता देविदास बेडके (५० रा.राजापूर ता.गेवराई) असे उष्माघाताने मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. दरम्यान, यावर्षी जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे. त्यातच मार्च, एप्रिल महिन्यात कडक ऊन जाणवले. पारा ४५ अंशांच्यावर गेला होता. त्यामुळे अंगाची लाहीलाही होत होती. याच उन्हाच्या त्रासामुळे सहा लोकांचा मृत्यू झाल्याच्या अफवा पसरल्या. यामध्ये शिवराज संदीपानराव खरसाडे (३० रा.पाचेगाव ता.गेवराई), चंद्रकांत मारूती हिरवे (४० रा.माळीवेस बीड), परमेश्वर दादाराव वाघ (४४ रा.कदमवाडी ता.बीड), विक्रम भिमराव गायकवाड (३८ रा.बनसारोळा ता केज), दत्तात्रय सुदाम चव्हाण (१६ बीड सांगवी ता.आष्टी) यांचा समावेश आहे. खरसाडे यांचे शवविच्छेदन करून व्हिसेरा राखीव ठेवला आहे. तर हिरवे आणि वाघ यांचा मृत्यू ह्रदयात रक्ताच्य गाठीने पुरेशा रक्त पुरवठ्या अभावी, गायकवाड यांचा लिव्हरवर सुज आल्याने तर चव्हाण याचा ह्रदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राधाकृष्ण पवार, प्र.अतिरिक्ति आरोग्य अधिकारी डॉ.संजय कदम यांच्या मार्गदर्शनखाली प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाºयांनी या प्रकरणांची चौकशी केली आहे.
कसा ठरविला उष्माघात?सुमता बेडके यांना उष्माघाताची लक्षणे दिसून आली. तसेच त्यांना मानसोपचार तज्ज्ञांकडे उपचार केले जात होते. त्यामुळे त्यांना उन्हापासून बचावासाठी घ्यावयाच्या काळजीबाबत जास्त समजत नव्हते. या व इतर लक्षणांची माहिती घेऊन संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकाºयांनी चौकशी करून हा मृत्यू उष्माघाताने झाल्याचे जाहीर केले.