परळी : भाजपच्या नेत्या खा.प्रितम मुंडे यांच्या उपस्थितीत येथील छत्रपती संभाजी महाराज चौक भागात सकाळी 10 वाजेपासून चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे जवळपास अडीच तास परळी - गंगाखेड ,परळी -बीड व परळी शहर भागातील उड्डाणपूल मार्गावर वाहतूक ठप्प झाली होती. आंदोलनादरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. 'आरक्षण आमच्या हक्काचं ,नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण मिळालेच पाहिजे', अशा घोषणांनी आंदोलन परिसर दणाणून गेला होता.
आंदोलकासमोर खासदार प्रीतम मुंडे यांच्यासह फुलचंद कराड ,मारोती मुंडे गुरुजी,जयश्री गीते, डॉ शालिनी कराड, निळकंठ चाटे, रमेश गायकवाड, श्रीराम मुंडे त्यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांचे भाषण झाले. त्यानंतर साडे बाराच्या सुमारास पोलिसांनी खा.प्रितमताई मुंडे यांच्यासह 50 भाजपा कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यांना पोलिसांच्या गाडीत बसवून परळी शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. काही वेळाने आंदोलकांना सोडून देण्यात आले. पोलिस ठाण्यातून खासदार प्रीतम मुंडे बाहेर येताच कार्यकर्त्यांनी पुन्हा जोरदार घोषणाबाजी केली.
आंदोलनादरम्यान कुठला अनुचित प्रकार घडला नाही. एसटी महामंडळाच्या बसेस खाजगी वाहने ,दुचाक्या रस्त्यावर थांबल्या होत्या ,बाहेरगावच्या नागरिकांचे मात्र हाल झाले. आंदोलनाच्या वेळी रुग्णवाहिका व रुग्णांच्या गाड्या सोडण्यात आल्या. अंबाजोगाईचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील जायभाये ,परळी शहरचे पोलीस निरीक्षक हेमंत कदम सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरक्ष पालवे, अशोक खरात, मोहन जाधव यांच्यासह इतर पोलिस अधिकारी-कर्मचारी, होमगार्ड यांचा चोख पोलिस बंदोबस्त होता.