- मधुकर सिरसटकेज ( बीड) : नवनिर्माण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विजयसिंह बाळा बांगर यांनी मस्साजोग येथील स्वर्गीय सरपंच संतोष देशमुख यांचे नाव त्यांच्या संस्थेच्या एका माध्यमिक शाळेला देण्याचा व त्याच शाळेच्या प्रांगणात त्यांचा पुतळाही उभारण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. सामाजिक सलोखा वाढीसाठी बांगर यांनी घेतलेल्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे.
पाटोदा येथील नवनिर्माण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विजयसिंह बाळा बांगर यांनी सोमवारी ( दि. 21 ) सकाळी 10 वाजता मस्साजोग येथे येऊन स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या एका शाळेला स्वर्गीय सरपंच संतोष देशमुख यांचं नाव देण्याचा आपण कार्यकारी मंडळाच्या बैठकीत ठराव मंजूर केल्याची व याच शाळेच्या प्रांगणात संतोष देशमुख यांचा पुतळाही उभारणार असल्याची माहिती बांगर यांनी यावेळी दिली. यांवेळी सेवा सोसायटीचे संचालक- सय्यद सज्जाद, सामाजिक कार्यकर्ते सचिन पवार यांच्यासह मस्साजोग येथील गावकरी मोठ्या संख्येने हजर होते.
तळागाळापर्यंत विचार पोहचविण्यासाठीच...संतोष देशमुख हे मानवतावादी होते. त्यांचे विचार तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी नवनिर्माण संस्थेच्या एका माध्यमिक शाळेला सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देण्याचा आपण निर्णय घेतला. शेवटच्या श्वासापर्यंत आपण देशमुख कुटुंबियांसोबत राहणार असल्याचेही बांगर यांनी जाहीर केले.
लढा चालूच राहणारसरपंच संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपीना फाशीची शिक्षा होईपर्यंत लढत राहू. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या शब्दावर विश्वास ठेवून हा लढा शेवटपर्यंत चालूच राहणार असल्याचे धनंजय देशमुख यांनी सांगितले.