बीड : १ मार्च रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून सौ.के.एस.के. महाविद्यालयात कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागातील प्रा. डॉ. प्रज्ञा रामदास महेशमाळकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उपप्राचार्य डॉ.ए.एस.हंगे, शिवानंद क्षीरसागर, संस्था प्रशासक डॉ. राजा मचाले, पदव्युत्तर विभाग प्रमुख डॉ. रेखा गुळवे, कमवि उपप्राचार्य सय्यद लाल, पर्यवेक्षक प्रा.जालिंदर कोळेकर तसेच सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी डॉ. सय्यदा एस. पी., प्रा. एस. जी. झाडे, प्रा. बी. एल. घाडगे, आर. एन. शिंदे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आदी उपस्थित होते.
काेंडवाडा दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
बीड : मोकाट गुरांना कोंडण्यासाठी पालिकेच्या मालकीचा कोंडवाडा आहे. परंतु, त्याची अवस्था खराब झालेली आहे. मागील अनेक वर्षांपासून त्याची दुरुस्ती झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. कोंडवाडा दुरुस्त करून मोकाट गुरांना त्यात कोंंडावे, अशी मागणी होत आहे.
प्रशिक्षण केंद्रासमोर रिक्षा पार्किंग
बीड : आरोग्य विभागाच्या जिल्हा प्रशिक्षण केंद्रासमोर अवैध प्रवासी वाहतूक करणारे रिक्षाचालक अनधिकृतपणे पार्किंग करीत आहेत. त्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. याकडे वाहतूक शाखा पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने संताप व्यक्त होत आहे. कारवाई करण्याची मागणी होत आहे.
नालीतील घाण पाणी रस्त्यावर
बीड : शहरातील भक्ती कन्स्ट्रक्शन भागात नाल्या व्यवस्थित नसल्याने आणि अनेक ठिकाणी नाल्यांची सफाई होत नसल्याने आतील घाण पाणी रस्त्यावर येत आहे. त्यामुळे वाहनधारकांसह पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. पालिकेने कारवाई करून नागरिकांचे हाल थांबवावेत, अशी मागणी होत आहे.
वीजबिल न भरणाऱ्यांवर कारवाई
वडवणी : तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक ठिकाणी विजेच्या तारांवर आकडे टाकून वीजचोरी केली जात आहे. यामुळे वेळोवेळी वीज गुल होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी वीजचोरी करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे.
अडगळीतले कुलर, फॅन दुरुस्तीला
बीड : सध्या उन्हाचा कडाका जाणवण्यास सुरुवात झाली आहे. गरमीपासून बचाव व्हावा म्हणून कुलर, फॅन, एसीचा आधार घेतला जात आहे. अडगळीला पडलेले फॅन, एसी, कुलर दुरुस्तीसाठी बाहेर काढले जात आहेत. सुटे पार्ट महाग झाले असून, दुरुस्तीचा खर्चदेखील वाढत आहे. मात्र, थंडावा मिळावा म्हणून याकडे कानाडोळा करीत दुरुस्त करण्याकडे कल वाढत आहे.
स्वच्छतागृहामुळे प्रवासी वैतागले
शिरूर कासार : येथील बसस्थानकातील स्वच्छतागृहाची दुरवस्था झाली असून, प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. स्वच्छतागृह अस्वच्छ असल्याने अनेक जण उघड्यावर लघुशंका करीत आहेत. दुरुस्ती करण्याची मागणी नागरिक, प्रवाशांमधून होत आहे.
दारूविक्री बंद करण्याची मागणी
आष्टी : तालुक्यात ठिकठिकाणी अवैध दारू बनविली जाते. यामुळे अनुचित प्रकार घडत आहेत. अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ग्रामीण भागातील महिलांनी दारूबंदीची मागणी केली आहे. पोलिसांनी कडक पाऊले न उचलल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.