बीड : प्राजक्ताताई माळीबाबत माझ्या स्टेटमेंटचा गैरअर्थ निघाला म्हणत आमदार सुरेश धस यांनी सोमवारी दिलगिरी व्यक्त केली.
प्राजक्ताताई माळीबाबत माझ्या स्टेटमेंटचा गैरअर्थ निघाला. मला त्यांचा अपमान करायचा नव्हता किंवा त्यांच्या चारित्र्याबाबतीत तर बोलण्याचा विषयच नव्हता. मी प्राजक्ताताईसह सर्व स्त्रीयांबाबत आदर बाळगतो. माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ निघाल्याने त्यांचे किंवा कोणत्याही स्त्रीचे जर मन दुखावले असेल, तर मी प्रामाणिकपणे दिलगिरी व्यक्त करतो, असे निवेदन आमदार सुरेश धस यांनी केले आहे.
दिलगिरी व्यक्त केल्याचे निवेदन करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी प्रसार माध्यमांशी बोलताना आमदार सुरेश धस यांनी प्राजक्ता माळींचा उल्लेख केला होता. त्यानंतर प्राजक्ता माळी यांनी महिला आयोगाकडे तक्रार दाखल करून मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती.
माळी यांच्यावरील ‘त्या’ विधानाची चौकशी करा!अजित पवार गटाचे नेते मंत्री धनंजय मुंडे यांंच्यावर टीका करताना भाजपचे आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांना लक्ष्य केले. त्यांनी केलेल्या विधानावरून माळी यांनी महिला आयोगाकडे तक्रार केली. आयोगाने या तक्रारीची दखल घेतली असून, पोलिसांना चाैकशीचे आदेश दिले आहेत, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सोमवारी पुण्यातील पत्रकार परिषदेत दिली. चाकणकर म्हणाल्या, तक्रार अर्जाची प्रत बीड पोलिस अधीक्षक, मुंबई पोलिस अधीक्षक तसेच सायबर क्राइम यांना पाठवण्यात आली आहे.