स्वच्छतेच्या अभावाने आजाराला आमंत्रण
माजलगाव : शहरातील विविध ठिकाणी विखुरलेला उघड्यावरील कचरा रोगराईला आमंत्रण देणारा ठरत आहे. स्वच्छतेच्या अभावामुळे आजारांची शक्यता आणखी वाढत आहे. नगर परिषदेच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. नगर परिषद प्रशासनाने कोरोना संसर्गामुळे स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्यासाठी मोहीम आखण्याची गरज निर्माण झाली आहे.
रस्त्यालगतचे ढीग वाहतुकीला अडथळा
बीड : माजलगाव तालुक्यातील टाकरवण ते टाकरवण फाटा रस्त्याच्या कडेला टाकलेले खडीचे ढीग वाहतुकीस अडथळा ठरत आहेत. या ढिगाऱ्यामुळे रस्ता अरुंद होऊन अपघात घडू लागले आहेत. एक तर रस्ता दुरुस्त करा किंवा रस्त्याच्या बाजूला टाकलेली खडी उचला, असे म्हणण्याची वेळ आली आहे. ढीग टाकण्यात आले. मात्र, अद्यापही रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही. रस्ता दुरुस्त करून ढीग उचलण्याची मागणी आहे.
रेंज मिळत नसल्याने मोबाइलधारक हैराण
पाटोदा : शहर व परिसरात बीएसएनएलची मोबाइल सेवा सातत्याने विस्कळीत होत आहे. समोरच्या व्यक्तीला फोन लावला तरी रेंज उपलब्ध नसते. जर रेंज उपलब्ध असेल, तर ती व्यक्ती आऊट ऑफ कव्हरेज एरिया, असे सांगितले जाते. अशी स्थिती इंटरनेट कनेक्शनबाबतीतही झाली आहे. सोशल मीडियाचा वापर करताना मोबाइलमध्ये रेंज दिसते. मात्र, कामकाज होत नाही, अशा स्थितीमुळे मोबाइलधारक हैराण झाले आहेत.
घरकुलाचे हप्ते लवकर देण्याची मागणी
बीड : कित्येक महिन्यांपासून बांधकाम पूर्ण झालेल्या घरकुलांचे थकलेले हप्ते नगर परिषदेकडून लाभार्थ्यांच्या खात्यावर टाकण्यात आलेले नाहीत. याबाबत वारंवार मागणी करूनही आश्वासनाशिवाय दुसरे काहीही लाभार्थींना मिळत नाही. तातडीने हा प्रश्न मार्गी लावावा; अन्यथा आंदोलनाचा इशारा लाभार्थ्यांनी दिला आहे.
काटेरी झुडपांचा वाहनधारकांना त्रास
राक्षसभुवन : गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन ते उमापूर या १० किमी रस्त्यालगत बाभळीची काटेरी झाडे वाढली आहेत. रस्ता लहान, झाडे मोठी, अशी परिस्थिती झाल्यामुळे अनेकांना याचा त्रास होत आहे. झुडपे काढण्याची मागणी ग्रामस्थांसह वाहन चालकांनी केली आहे; परंतु याकडे लक्ष दिले नाही.