Walmik Karad Beed:बीडमधील पवनचक्की कंपनीला खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला आणि सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील संशयित वाल्मीक कराड हा सध्या पोलीस कोठडीत आहे. बीड शहर पोलीस ठाण्यात असलेल्या वाल्मीक कराड याला काही पोलीस अधिकाऱ्यांकडून खास ट्रीटमेंट दिली जात असल्याचा आरोप होत आहे. त्यातच एक माजी सरपंच कराड याला पोलीस कोठडीत भेटल्याचा आरोप मृत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केला आहे. तसंच माझ्यासोबत अरेरावी झाल्याचा दावाही त्यांनी केला. यावर आता सदर माजी सरपंचाने स्पष्टीकरण दिलं आहे.
"मला सीआयडीने चौकशीसाठी बोलावल्याने मी पोलीस ठाण्यात गेलो होतो. मी सरपंच असल्याने वाल्मीक कराड याच्याशी माझा संबंध आलेला होता. पोलीस अधिकाऱ्यांनी मला तीन तास तिथं चौकशीसाठी थांबवलं होतं. मात्र यावेळी मी वाल्मीक कराडला भेटलेलो नाही. धनंजय देशमुखांनी केलेला दावा खोटा आहे," असं स्पष्टीकरण माजी सरपंच बालाजी तांदळे यांनी दिलं आहे.
दरम्यान, "पोलीस ठाण्यात मला बघताच धनंजय देशमुख असं म्हणाले की, तुझ्या चेहऱ्यावर चांगलीच टवटवी आहे. मी त्यांना सांगितलं की मला चौकशीसाठी बोलावलं आहे," असंही तांदळे यांनी म्हटलं आहे.
धनंजय देशमुखांचा आरोप काय?
सरपंच हत्या प्रकरणाच्या तपासाची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी धनंजय देशमुख व त्यांचे साडू दादासाहेब खिंडकर हे बुधवारी सायंकाळच्या सुमारास बीड शहर ठाण्यात आले होते. यावेळी तेथे कारेगावचे माजी सरपंच बालाजी तांदळेदेखील होते. तांदळे यांनी धनंजय यांना ‘तू इथे काय करायला, सीआयडीवाले कुठे आहे’, असे म्हणत वाल्मीक कराड याला ठेवलेल्या कोठडीकडे गेले. तिथून परत आल्यानंतर ‘तुम्ही ६ डिसेंबरच्या दिवशी पवनचक्कीजवळ झालेल्या वादाच्या ठिकाणी होतात’, असे धनंजय म्हणाले. यावर ‘आरोपी मीच पकडले’ असे सांगत हत्या करणाऱ्या सुदर्शन घुले याचा फोटो धनंजय यांना दाखवत तांदळे यांनी अरेरावी केल्याचा आरोप आहे.