बीड: शहरापासून जवळच असलेल्या पाली येथील कॅनरा बँकेत धाडसी दरोडा टाकत चोरट्यांनी तब्बल १८ लाख रुपयांची रोकड लंपास केली. ही घटना गुरुवारी पहाटे दीड ते सव्वा चार वाजण्याच्या सुमारास घडली. यावेळी चोरट्यांनी तोंडाला मास्क आणि हातात हँडग्लोज घातले होते. बँकेच्या पाठीमागील भिंत तोडून त्यांनी आत प्रवेश केला आणि त्यानंतर गॅस कटरने लॉकर तोडून रक्कम लंपास केल्याचा संशय आहे. या प्रकरणामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून, बीड पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
बुधवारी सर्व कामकाज संपवून सायंकाळी बँक बंद करण्यात आली होती. यावेळी जवळपास १८ लाख रुपयांची रोकड लॉकरमध्ये ठेवण्यात आली होती. पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी बँकेच्या मागील बाजूची भिंत तोडली. त्यास मोठे छिद्र पाडून ते आत शिरले. आत प्रवेश केल्यानंतर लॉकर तोडण्यासाठी त्यांनी गॅस कटरचा वापर केला. साधारण दोन तास चोरटे हे काम करत होते. सर्व रक्कम हाती लागल्यानंतर ते सर्व साहित्य घेऊन पसार झाले. सकाळी शेजारी राहणाऱ्या नागरिकांना हा प्रकार लक्षात येताच त्यांनी बीड ग्रामीण पोलिसांना माहिती दिली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
शेजाऱ्याच्या बल्बवर झाकला कपडाबँकेच्या पाठीमागील बाजूस एका व्यक्तीने घरासमोर प्रकाश पडावा म्हणून बल्ब लावला होता. याचा प्रकाश बँकेच्या मागील बाजूस पडत असल्याने, चोरट्यांनी प्रथमतः या बल्बवर कपडा झाकला. त्यानंतर पाठीमागून छिद्र पाडून आत प्रवेश केला.
एलसीबी, पोलिसांचे पथक मागावरघटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, उपनिरीक्षक श्रीराम खटावकर, बीड ग्रामीणचे पोलिस निरीक्षक मारुती खेडकर, सपोनि बाळराजे दराडे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर त्यांनी लगेच वेगवेगळे पथक स्थापन करून तपासाला सुरुवात केली आहे.
बँकेत दोघेच, बाहेर किती?सूत्रांच्या माहितीनुसार, बँकेमध्ये केवळ दोघांनीच प्रवेश केला होता. यावेळी त्यांच्या तोंडाला मास्क आणि हातात ग्लोज असल्याने हाताचे ठसे मिळू शकले नाहीत. आत दोघे असले तरी बाहेरही काही लोक मदतीला असण्याची शक्यता आहे. याचा शोध पोलिस घेत आहेत.
रेकी करून टाकला दरोडाएवढा धाडसी दरोडा लगेच येऊन टाकणे शक्य नाही. यासाठी आरोपींनी अगोदरच एक-दोन दिवस रेकी केल्याचा पोलिसांचा संशय आहे. त्यादृष्टीने पोलिस सीसीटीव्ही आणि इतर संशयितांची चौकशी करत आहेत.
डीव्हीआरही नेला काढूनचोरट्यांनी प्रवेश करण्यापूर्वी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे तोंड वर छताकडे केले. त्यानंतर परत जाताना डीव्हीआरदेखील काढून नेला. त्यामुळे पोलिसांना शोध घेणे अवघड जात आहे. असे असले तरी पोलिस सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील सर्व कॅमेरे तपासत आहेत.
महानिरीक्षकांचे चोरट्यांकडून स्वागतविशेष पोलिस महानिरीक्षक विरेंद्र मिश्र हे गुरुवारी बीड दौऱ्यावर होते. ते येण्यापूर्वीच चोरट्यांनी हा धाडसी दरोडा टाकला. मिश्र यांनी या घटनेचाही आढावा घेतल्याचे सांगण्यात आले.
Web Summary : In Beed, robbers broke into Canara Bank, stealing ₹18 lakh. They disabled the CCTV, used gas cutters to open lockers, and escaped undetected. Police are investigating the daring heist.
Web Summary : बीड में, चोरों ने केनरा बैंक में सेंध लगाकर ₹18 लाख चुरा लिए। उन्होंने सीसीटीवी को निष्क्रिय कर दिया, लॉकर खोलने के लिए गैस कटर का इस्तेमाल किया और बिना पता लगे भाग गए। पुलिस साहसी डकैती की जांच कर रही है।