Manoj Jarange Patil ( Marathi News ) : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला दोन आठवडे उलटून गेल्यानंतरही तीन आरोपी अजूनही फरार आहेत. या पार्श्वभूमीवर फरार आरोपींना अटक करावी आणि मुख्य सूत्रधाराचा शोध घ्यावा, या मागणीसाठी सर्वपक्षीय नेत्यांकडून २८ डिसेंबर रोजी बीडमध्ये मोर्चाचं आयोजन केलं आहे. या मोर्चात सर्वांनी सहभागी व्हावं, असं आवाहन मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे.
मनोज जरांगे म्हणाले की, "मी उद्या परभणीतील मृत तरुणाच्या कुटुंबीयांना भेट देणार आहे आणि त्यानंतर मस्साजोग इथं सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहे. तसंच २८ डिसेंबर रोजी जनतेनं बीडमध्ये मोर्चाचं आयोजन केलं आहे. या मोर्चामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं. हा जनतेचा मोर्चा असल्याने मीदेखील त्यामध्ये जाणार आहे. कोणाचाही बाप आला तरी हे मॅटर मी दबू देणार नाही," अशी भूमिका जरांगे पाटील यांनी मांडली आहे.
पोलीस प्रशासन अॅक्शन मोडवर
पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी बीडच्या पोलीस अधीक्षकपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर कार्यवाही सुरू केली आहे. "कोणीही दबावाखाली काम करू नका. राजकीय नेत्यांचे ऐकू नका. जर काही असेल तर थेट मला सांगा. सर्वांनी बिनधास्त काम करा," अशा सूचना पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी ठाणेदारांना दिल्या. पदभार घेतल्यानंतर सोमवारी त्यांनी पहिली क्राईम मीटिंग घेतली. यावेळी त्यांनी ठाणेदारांना आधार देण्यासह अप्रत्यक्ष कारवाईचा इशाराही दिला. मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणामुळे बीड जिल्हा राज्यभर गाजला. यातील आरोपींना अद्यापही अटक करण्यात आलेली नाही. याच प्रकरणाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अविनाश बारगळ यांची बदली करत नवनीत काँवत यांची पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती केली.
शनिवारी रात्री साडेदहा वाजता पदभार घेतल्यानंतर रविवारी लगेच कामाला सुरुवात केली. सोमवारी त्यांनी जिल्ह्यातील सर्व ठाणेदार आणि प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. यामध्ये त्यांनी सुरुवातीला सर्वांचा परिचय करून घेतला. त्यानंतर त्यांनी सर्वांना विश्वासात घेत काही सूचना केल्या. आपल्या हद्दीतील अवैध धंदे बंद करा, कारवाया करा, राजकीय नेत्यांचे ऐकू नका, काहीही असेल तर मला सांगा, बिनधास्त काम करा, हलगर्जी झाली तर तोंडाने बोलणार नाही, पण कागदावर कारवाई करेन, असा इशाराही दिला. तसेच गुन्हेगारी संपवून बीडचे नाव चांगले करायचे आहे, त्यामुळे सर्वांनी निर्भयी वातावरणात काम करावे, असेही काँवत यांनी सर्वांना सांगितले. यावेळी अपर अधीक्षक सचिन पांडकर, कविता तिडके यांच्यासह उपअधीक्षक, ठाणेदार व इतर शाखांचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते.